पणजी (गोवा) : भारताला युद्ध नको आहे. मात्र, डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूचे डोळे काढून हातात देऊ, असा इशारा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिला. ते गोव्यातील एका सभेत बोलत होते.


गोव्यातील हळदोना विधानसभा क्षेत्रात भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मनोहर पर्रिकर म्हणाले, "आम्हाला लढण्यात रस नाही. मात्र, कुठल्याही देशाने आमच्यावर वाईट नजर टाकली, तर त्यांचे डोळे काढून हातात देऊ. तेवढी ताकद आमच्यात नक्कीच आहे."

गोव्यातील जनतेने जगाला सांगावं की, आम्ही केंद्रात एक असा माणूस पाठवला आहे, ज्याने शत्रूच्या गालावर जोरदार थप्पड लगावली आहे, असेही सभेत बोलताना पर्रिकर म्हणाले.

"सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून कोणताही गोळीबार झालेला नाही. जर ते एकदा गोळीबार करतील, तर आपण दोनवेळा करतो. आपण शत्रूला जशास तसे उत्तर देत आहोत. म्हणूनच ज्यावेळी त्यांना हे लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी स्वत:हून हे थांबवण्याची मागणी केली.", असे पर्रिकर म्हणाले.