मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देशाच्या वीर जवानांनच्या मदतीसाठी कायमच तत्पर असतो. अक्षय देशाच्या सैनिकांविषयी फक्त भरभरुन बोलतच नाही तर त्यांच्यासाठी आपल्या परीनं होईल तेवढी मदतही करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसाममध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान नरपत सिंह हे शहीद झाले. त्यानंतर अक्षयनं त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना 9 लाखांची मदत केली. नुकतंच आसाममध्ये उल्फा नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते.


शहीद जवान नरपत सिंह यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून अक्षयनं शहीद जवानाच्या पत्नीचं सांत्वन केलं. रिपोर्ट्सनुसार अक्षयनं त्यांना 9 लाखांची मदत केली. शहीद नरपत सिंह यांच्या पश्चात 3 मुली आणि पत्नी असा परिवार आहे. नुकतंच अक्षय कुमारनं जम्मू काश्मीरमधील बीएसएफ जवानांचीही भेट घेतली होती.

काही दिवसांपूर्वी अक्षयनं लष्कराला 80 लाखांची मदत केली होती. अक्षय स्वत: सैनिकांना मदत करतोच. पण देशातील इतर नागरिकांनाही सैनिकांना मदत करता यावी यासाठी अॅप तयार करण्याचा त्याचा विचार आहे. अक्षयचे वडील स्वत: लष्करात होते. सर्जिकल स्ट्राईकनंतर जेव्हा देशात यावरुन राजकारण सुरु झालं होतं तेव्हा अक्षयनं सोशल मीडियावरुन आवाहन केलं होतं की. 'पुरावे मागण्यापेक्षा देशाच्या सैनिकांच्या भविष्याविषयी चिंता करा.