India Weather : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार देशाच्या काही भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. विशेषत: उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे. तर काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही देशातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


राजस्थानमध्ये हलक्या पावसाची शक्यता


राजस्थानमध्ये 16 ऑगस्टपासून हलक्या पावसामुळं वातावरण आल्हाददायक झालं आहे. येत्या काही दिवसांत पूर्व राजस्थानच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.  त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये 20 आणि 21 ऑगस्टला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


उत्तराखंडसह हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस सुरु


सध्या उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळं अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 आणि 22 ऑगस्ट रोजी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पाऊस होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया 24 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. आज उत्तराखंडमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोमवार आणि मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


देशातील या राज्यात पावसाची शक्यता


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज (20 ऑगस्ट) देशातील विविध भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील पावसाची शक्यचता आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारमध्ये 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशमध्ये 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


India Rain : यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा, एल निनोचा परिणाम; शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता