India Weather : सध्या देशाच्या काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. विशेषत: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसर आज उत्तर भारतासह पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांना देखील फटका बसला आहे. रस्ते वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही जणांच्या मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान, आजही उत्तराखडंसह हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत.
दिल्लीत सकाळपासून पावसाला सुरुवात
राजधानी दिल्लीसह सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पावसासोबत जोरदार वारे देखील वाहत आहेत. अचानक आलेल्या पाऊस आणि वादळामुळे दिल्लीचे वातावरणही आल्हाददायक झाले आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाला आहे.
या भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीममध्ये आज (19 ऑगस्ट) मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तराखंडसह हिमाच प्रदेशमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांत उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 19 ते 22 ऑगस्ट पर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आंध्र प्रदेशसह तेलंगणा राज्यात देखील मुसळधार पाऊस पडू शकतो.
येत्या दोन दिवसात दक्षिण भारतातही पावसाची शक्यता
येत्या दोन दिवसात दक्षिण भारतातही विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.तर पुढील दोन दिवस तामिळनाडूमध्ये उबदार हवामान राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील बियास, रावी आणि सतलज या तिन्ही प्रमुख नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं हिमाचलमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं लोकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: