नवी दिल्ली: सीमेवरील वाढत चाललेल्या कारवायांमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन अतिरेक्यांचे मृतदेह घेऊन जा, असं सांगत गोळीबार आता सहन केला जाणार नाही, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिलाय.


भारताकडून पाकिस्तानी उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देताना म्हटलंय की, एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कुठल्याही कारणाशिवाय होणाऱ्या गोळीबारामुळे आम्ही चिंतीत आहोत. यापुढे गोळीबार सहन केला जाणार नाही, असं सांगत मृत्युमुखी पडलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह घेऊन जायला सांगितलेय.


जम्मू काश्मीरच्या सुंदरबनमध्ये 21 ऑक्टोबर रोजी नियंत्रण रेषेवर (एलओसी) झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे तीन जवान शहीद झाले होते. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन जाण्याविषयी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. रविवारच्या घटनेच्या वेळी घुसखाेर लढाईच्या पोशाखात हाेते. हे घुसखाेर बॉर्डर अॅक्शन टीम (बीएटी) चे सदस्य हाेते असं सांगण्यात आलंय. बीएटीमध्ये पाकिस्तानी सेनेचे जवान आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांचा समावेश असताे.

दरम्यान, आजच दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावर चर्चा होणार आहे. सीमेवर सध्या भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. 30 मेपासून दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न सात वेळा हाणून पाडले असून भारतीय सेनेने 23 दहशतवाद्यांना कंठस्नान दिले गेलेय.