Asia Cup India vs Pakistan : जवळपास वर्षभरानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan Cricket Match Asia Cup 2022)आज क्रिकेट सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले असून सामना पाहण्यासाठी खास नियोजनही अनेकांनी केले आहे. मात्र, हा सामना पाहिल्यास पाच हजार रुपयांचा दंड (Fine 5000 Rupees) ठोठावणार असल्याचे आदेश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने (NIT) दिले आहेत. विद्यार्थ्यांनी हा सामना गटाने पाहू नये आणि सामन्याशी संबंधित कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करू नये असे आदेशही देण्यात आले आहेत. याआधी एनआयटीमध्ये क्रिकेट सामन्यावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. 


विद्यार्थी कल्याण विभागाच्या प्रमुखांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सामना सुरू असताना आपल्याच खोलीत राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दुबई येथे क्रिकेट मालिका सुरू आहे. विद्यार्थ्यांनी याकडे फक्त खेळ म्हणून पाहावे. क्रिकेट सामन्यावरून शैक्षणिक संस्था, वसतिगृहात कोणत्याही प्रकारचे बेशिस्त वर्तन, शिस्तभंग करू नये अशी ताकीद विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 


नियमांचे उल्लंघन केल्यास 5 हजारांचा दंड 


रविवारी होणाऱ्या सामन्याच्या दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपल्याच खोलीत राहावे,  इतर विद्यार्थ्यांच्या खोलीत प्रवेश करू नये, क्रिकेट सामना गटाने पाहू नये असे आदेश देण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. त्याशिवाय वसतिगृहातून बाहेर काढण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 


2016 मध्ये झाला होता मोठा वाद


विद्यार्थ्यांना क्रिकेट सामन्याशी निगडीत कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, सामना सुरू असताना आणि सामना सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आपल्या खोलीतून बाहेर पडू नये असेही आदेश देण्यात आले आहेत. वर्ष 2016 मध्ये टी-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर वसतिगृहातील आणि वसतिगृहाबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्यानंतर एनआयटी कॅम्पस अनेक दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: