नवी दिल्ली/वॉशिंग्टनः संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अमेरिका दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण करार झाला आहे. या करारानुसार भारत जगातील कोणत्याही अमेरिकी विमानतळाचा वापर करु शकणार आहे. तसेच अमेरिकाही भारतीच्या लष्करी विमानतळांचा वापर करु शकणार आहे.

 

अमेरिका आणि भारताने 'लॉजिस्टीक एक्स्चेंज मेमोरेंडम ऑफ अॅग्रीमेंट' म्हणजेच एलईएमए या महत्वाच्या करारावर स्वाक्षरी केली. पेंटागनमध्ये ही बैठक पार पडली. दोन्ही देश सुरक्षेसंबंधी सर्व संरक्षण सामग्री आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करु शकणार आहेत.

 

काय आहे कराराचा फायदा?

 

व्यावहारीक संपर्क आणि देवाण-घेवाणीसाठी या कराराचा फायदा होईल, असं करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पर्रिकर आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री एस्टन कार्टर यांनी सांगितलं. करारामुळे संरक्षण व्यवसाय आणि तंत्रज्ञानाच्या भागिदारीसाठी फायदा होणार आहे, अशी माहिती दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली.

 

एलईएमए या करारानुसार दोन्ही देशांच्या सैन्य दलांना एकमेकांच्या अन्न, पाणी, निवारा, परिवहन, सर्व प्रकारचं इंधन, कपडे, आरोग्य सेवा, दुरुस्ती आणि देखभाल सेवा, प्रशिक्षण सेवा आणि अन्य आवश्यक सामग्रींचा वापर करता येणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये या करारासाठी चर्चा चालू होती. त्यामुळे करार यशस्वीरित्या पार पाडल्याचा आनंद असल्याचं मत पर्रिकर यांनी व्यक्त केलं.