नवी दिल्ली: दिल्ली आणि आसपासच्या परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील मुख्य रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांसह अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही करावा लागला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींना या वाहतूक कोंडीतून व्हीव्हीआयपी मार्गामार्फत बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

 



 

केरींसोबत असलेल्या एका पत्रकाराने ही माहिती ट्वीट करून दिली. दरम्यान, यावर वाहतूक पोलिसांनीही केरी यांना काहीकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असल्याचे स्पष्ट केले. यानंतर त्यांना या वाहतूक कोंडीतून सुरक्षित बाहेर काढून त्यांच्या हॉटेलपर्यंत सोडण्यात आले. आता यावर संबंधित अधिकाऱ्यांना उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 



 

दिल्ली विमानतळावरून ते चाणाक्यपूरीमधील हॉटेलमध्ये जात होते. यावेळी जॉन केरींना दिल्लीतील सत्य मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

 

काल दिल्लीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे दिल्लीच्या गतीलाही एकप्रकारे ब्रेक लावला होता. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत होते.