India Becomes Fifth Largest Economy in World : जगभरात पुन्हा एकदा भारताचा डंका पाहायला मिळत आहे. ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. एका दशकाआधी या क्रमवारीत भारताचा क्रमांक अकरावा होता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ब्रिटिशांचं राज्य असणारा भारत आता ब्रिटनला मागे टाकत अग्रेसर ठरला आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे.
भारताने 2021 वर्षी शेवटच्या तिमाहीमध्ये ब्रिटनच्या पुढे जात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जीडीपीच्या नव्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत भारताने आर्थिक महसूल वाढवला आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था 2027 पर्यंत ब्रिटनच्या पुढे असेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर यंदा भारतीय अर्थव्यवस्थेत सात टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे.
भारतीय शेअर्सवरील जागतिक गुंतवणुकीचा परिणाम
या तिमाहीत भारतीय शेअर्समध्ये जागतिक गुंतवणुकीमुळे देशाने एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये चीननंतर दुसरे स्थान मिळवलं आहे. तिमाहीच्या शेवटी डॉलरच्या विनिमय दराचा वापर करून, रोखीच्या बाबतीत मार्चमधील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 854.7 डॉलर बिलियन होता, तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार 816 डॉलर इतका होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) माहिती आणि ब्लूमबर्ग टर्मिनलवरील संगणक सॉफ्टवेअर वापरून ऐतिहासिक विनिमय दरांचा वापर करून ही आकडेवारी काढली जाते.
दरम्यान, या यादीत ब्रिटनची अर्थव्यवस्था आणखी घसरू शकते, असं तज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या तिमाहीत ब्रिटनचा जीडीपी केवळ एक टक्क्यांनी वाढला आणि चलनवाढीनंतर 0.1 टक्के कमी झाला. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल. जागतिक पातळीवर भारताच्या योगदानातही भर पडत आहे. तसेच विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे, ही भारतासाठी चांगली बाब आहे.
रुपयाच्या तुलनेत पाऊंड घसरला
रुपयाच्या तुलनेत पाऊंड घसरला आहे. या वर्षी भारतीय चलनाच्या तुलनेत पाऊंड आठ टक्क्यांनी घसरला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचीच्या अंदाजानुसार, आशियाई महासत्ता बनण्याच्या मार्गावर असलेल्या भारताने या वर्षी वार्षिक आधारावर डॉलरच्या बाबतीत ब्रिटनला मागे टाकलं आहे, फक्त अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी नंतर. एका दशकापूर्वी, भारत सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये 11 व्या क्रमांकावर होता तर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर होता.