नवी दिल्ली : चीनच्या भारताविरोधातल्या कुरापती काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. चीन आता भारतीय हद्दीतील दक्षिण लडाखजवळील पेगाँग त्सो लेकवर (Pangong Tso Lake) एक पूल बांधत आहे. यावर आता भारताने आक्षेप घेतला असून चीनने गेल्या 60 वर्षांपासून या भागावर कब्जा केला असल्याचं सांगितलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की चीनचा हा पूल अवैध असून त्याने त्वरीत याचे बांधकाम थांबवावं. भारताची या घटनेवर नजर असून देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी अत्यावश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचंही परराष्ट्र प्रवक्त्यांनी सांगितलं. 


जवळपास 140 किमी लांबी असलेल्या पेगाँग त्सो लेकच्या दोन तृतीयांश हिस्सा म्हणजे 100 किमीवर चीनच्या ताब्यात आहे. याच लेकवर आता चीन एक पूल बांधत असल्याचं एका सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे. 


अरुणाचलमधील 15 नावं बदलली
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चीननं अरुणाचल प्रदेशात 15 भागांसाठी चिनी नावांची घोषणा केली होती. चिनी अक्षरांत, तिबेटी आणि रोमन वर्णमालेतही नावं जाहीर करण्यात आली आहेत.  'ग्लोबल टाईम्स'नं याबाबतची बातमी दिली आहे. चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश 'झांगनान' किंवा 'दक्षिण तिबेट' म्हणून चिन्हीत करण्यात आलं आहे. 


गलवान व्हॅलीत भारताचे चीनला जशास तसं उत्तर
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीनकडून गलवान खोऱ्यात त्यांचा राष्ट्रीय ध्वज फडकवल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. चीनच्या या कृतीनंतर आता भारतीय सैन्यानेही जशास तसे उत्तर देत गलवान खोऱ्यात भारताचा ध्वज फडकवला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून ध्वज फडकवण्यात आल्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :