नवी दिल्ली: गेल्या महिन्याच्या तुलनेत भारताच्या बेरोजगारी दरात वाढ झाल्याचं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीवरून बुधवारी दिसून आलं आहे. भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये 7.45 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या महिन्यात तो 7.14 टक्के इतका होता. शहरी भागातील बेरोजगारीचा दर काहीसा कमी झाला असला तरी ग्रामीन भागातील दरामध्ये मात्र वाढ झाल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालंय.
भारतातील शहरी बेरोजगारीचा दर फेब्रुवारीमध्ये 7.93 टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या महिन्यात तो 8.55 टक्क्यांवर होता. तर ग्रामीण भागाातील बेरोजगारीचा दर 6.48 टक्क्यांवरून 7.23 टक्क्यांवर पोहोचला आहे, असं या आकडेवारीवरून दिसून येते.
या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येणार असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. तसेच देशातील अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यामुळे देशातील अनेक तरुणांना त्यांच्या नोकरीला मुकावं लागलं आहे. त्याचा परिणाम देशातील बेरोजगारीच्या दरावर झाला असून त्यामध्ये काहीशी वाढ झाल्याचं दिसून येतंय.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) ने गेल्या वर्षीच्या विकासदराचा अहवाल प्रकाशित केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था कोरोना काळातील मंदीतून सावरत असल्याचं स्पष्ट झालं. NSO कडून 24 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2021-22 पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) अहवालातील असं सांगण्यात आलं आहे की, कोरोनाच काळ सरल्यानंतर आता कामगार वर्गही सावरत आहे. तसेच शेतीमधून मिळणाऱ्या रोजगारातही वाढ होत असल्याचं ही आकडेवारी सांगतेय.