Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 262 रुग्णांची वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. दिल्लीमध्ये वाढता संसर्ग पाहता पुन्हा मास्क सक्ती करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट रोजी देशात 16 हजार 299 नवीन रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेनं आज रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.53 टक्के आहे.
नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक
देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.44 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी दिवसभरात 18 हजार 53 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 35 लाख 73 हजार 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या देशात 1 लाख 23 हजार 535 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
महाराष्ट्रात 1877 नवे रुग्ण, पाच जणांचा मृत्यू
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी महाराष्ट्रात एक हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1971 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, बुधवारी राज्यात 1847 नवे रुग्ण आढळले होते तर मंगळवारी राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली होती.
दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती
दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा मास्कचा (Mask) वापर अनिवार्य करण्यात आलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 24 तासांत 2700 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार, गेल्या 24 तासांत 2726 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये यावर्षी 2 फेब्रुवारीनंतर एका दिवसांत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तसेच, काल दिवसभरात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 14.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra Corona Updates) कोरोनाचा आलेख दिवसागणिक वर जाताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातही पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.