Delhi Corona Guidelines : दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा मास्कचा (Mask) वापर अनिवार्य करण्यात आलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 


राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा (Covid-19) आलेख चढता पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील केजरीवाल सरकारनं पुन्हा एकदा मास्कसक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. काल दिवसभरात दिल्लीत 2495 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तसेच, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 8506 वर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा डेली पॉझिटिव्हीटी दर 15.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. अशातच, गेल्या 24 तासांत 1466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. देशात पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणांवर मास्क अनिर्वाय करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकानं देशात मास्कमुक्ती केली होती. पण पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्याची वेळ आली आहे. अशातच दिल्ली सरकार सातत्यानं लोकांना कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन करत आहे.


अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात एक हजार 847 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता दिल्लीपाठोपाठ राज्यातही मास्कसक्ती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


देशातही कोरोनचा चढता आलेख 


गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 16,299 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 19,431 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 1,25,076 सक्रिय रुग्ण आहेत. तर देशाचा पॉझिटिव्हीटी दर 4.58 टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत 5,26,879 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या आजारातून आतापर्यंत एकूण 4,35,55,041 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे एकूण 2,072,946,593 डोस देण्यात आले आहेत.