Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा संसर्गात घट कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 430 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. देशात एका दिवसात 3 हजार 375 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल देशात 3 हजार 805 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशातील कोरोना सकारात्मकता दर 1.28 टक्के आणि साप्ताहिक कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 1.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात 37 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 45 लाख 53 हजार 42 वर पोहोचली आहे.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 37 हजार 444


मागील 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात देशात 3,375 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 673 वर पोहोचली. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 37 हजार 444 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 206 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.


मुंबईत शनिवारी 130 कोरोना रुग्णांची नोंद


मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबईत 130 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालीय. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झालाय. तर शनिवारी 121 रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर 98. 2 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांत 14 रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसल्याने या रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. 


महाराष्ट्रात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू


महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 449 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कालच्या पेक्षा ही संख्या कमी आहे. काल राज्यात 459 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. याबरोबरच आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. आज राज्यात 538 रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आज पाच कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.