Railway Employees Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (Railway Employees) एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस (Diwali Bonus) जाहीर झाला आहे. याचा लाभ 11 लाख 27 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दसऱ्याच्या आधीच रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना या बोनसचे वाटप करण्यात येणार आहे. या बोनसमुळं रेल्वे प्रशासनावर 1 हजार 832 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनसच्या माध्यमातून 17 हजार 951 रुपयांची रक्कम अदा केली जाणार आहे. हा बोनस अराजपत्रित कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. 


 नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ


दसऱ्यापूर्वीच रेल्वे प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस मिळणार आहे. मागील वर्षी देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर केला होता. यावर्षी देखील 78 दिवसांचा दिवाळी बोनस देण्याचे रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे. हा बोनस रेल्वेच्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. अधिकारी पदावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नॉन गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. क्लास वन, क्लास टू स्तरावरील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना गॅझेटेड कर्मचारी म्हटलं जातं. दरवर्षी हा बोनस दसरा आणि दुर्गापुजेच्या कालावधीमध्येच जाहीर केला जातो. महिन्याला सात हजार रुपये पगार असणारे नॉन गॅझेटेड कर्मचारी या बोनससाठी पात्र असणार आहेत. 78 दिवसांचा बोनस म्हणून जास्तीत जास्त 17 हजार 951 रुपये दिले जाणार असल्याचं पात्रतेच्या निकषांबद्दल स्पष्ट करण्यात आलं आहे.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार


रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. बोनस मंजूर केल्याबद्दल संपूर्ण रेल्वे परिवाराच्या वतीने पंतप्रधानांचे आभार. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवासी आणि मालवाहतूक सेवांच्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. 




 


बोनसमुळं रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन 


हा बोनस जाहीर झाल्यामुळं रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  हा बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून काम करणार आहे. ज्यामुळं कर्मचारी अधिक वेगानं आणि चांगल काम करतील. तसेच बोनसच्या पेमेंटमुळे येत्या सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळणार असल्याचेही निवदेनात म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं रुपडं पालटणार! CSMTसह 'या' रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी