Coronavirus Cases In India : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील 24 तासांत देशात 1300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 140 दिवसानंतर सर्वाधिक वाढ आहे. वातावरण बदलामुळे सर्दी ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यातच एच3एन2 च्या विषाणूने डोके वर काढले आहे, त्यामुळे नागरिकांचा धोका दुप्पट झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात 1,300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 7,605 इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या 0.02% इतके आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79% इतका आहे.
गेल्या 24 तासात 718 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,41,60,997 इतकी झाली आहे. देशातील दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हिटी दर 1.46% इतका आहे. सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.08% इतका आहे. मागील 24 तासात देशभरात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.06 कोटी कोविड चाचण्या केल्या गेल्या. गेल्या 24 तासात 89,078 कोविड चाचण्या झाल्या. तर भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 65 लाखांहून अधिक मात्रा (95.20 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 7,530 लस मात्रा देण्यात आल्या आहेत.
बुधवारी राज्यात 334 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात बुधवारी कोरोनाच्या 334 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1 हजार 648 वर गेली आहे. तर कोविडबाधित एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्यात अधिक रुग्ण आहे. पुण्यात 496, मुंबईत 361 आणि ठाण्यात 314 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, पंतप्रधान मोदींचा सल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (22 मार्च) सायंकाळी कोरोनाची आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन 2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची सूचनाही केली आहे.