नवी दिल्ली: ग्लोबल हंगर इंडेक्स अर्थात जागतिक भूक निर्देशांकच्या ताज्या अहवालानुसार भारताची कामगिरी शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत सुमार असल्याचे दिसून आलं आहे. 107 देशांच्या यादीत भारताचा 94 वा क्रमांक आहे. यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. राहुल गांधीनी केंद्र सरकारवर त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरल्याचा आरोप केला आहे.



राहुल गांधींनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहलंय की, "भारत उपाशी आहे कारण केंद्र सरकार त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे."


गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधार
ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 या नावाने प्रकाशित झालेल्या या अहवालात भारत 107 देशांच्या यादीत 94 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी 117 देशांच्या यादीत भारताचा 102 वा क्रमांक होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची रँकिंग सुधारली आहे. पण या वर्षी यादीतील देशांच्या संख्येतही घट झालीय. या आधी भारत 2015 साली भारत 93 वा, 2016 साली 97 वा, 2017 साली 100 वा, 2018 साली 103 व्या क्रमांकावर होता.


ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 च्या अहवालानुसार, 27.2 गुण असलेल्य़ा भारतात उपासमारीची समस्या ही 'गंभीर' आहे. या अहवालानुसार भारताची 14% लोकसंख्या कुपोषणाची बळी आहे.
याआधी 2019 सालच्या अहवालावरूनही राहुल गांधींनी सरकारवर टीकेची झोड उडवली होती.


भारताची शेजारील देशांपेक्षा वाईट कामगिरी


या अहवालानुसार मागील वर्षाच्या तुलनेत भारताचे स्थान जरी सुधारले असले तरी शेजारील देश नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश, इंडोनेशिया हे देश भारताच्या पुढे आहेत. या देशांची कामगिरी भारतापेक्षा चांगली असल्याचं म्हंटलं आहे. रवांडा, नायजेरिया, अफगानिस्तान, लिबिया, मोझांबिक यासारखे फक्त 13 देशच भारताच्या मागे आहेत.


भारतात उपासमारीची समस्या गंभीर
भारतात उपासमारीचे संकट हे मोठं गंभीर असल्याचं म्हंटलं आहे. विशेषत: लहान मुलांच्या कुपोषणाचे प्रमाण खूप भयानक आहे. ग्‍लोबल हंगर इंडेक्‍स तयार करताना पाच वर्षाच्या आतील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण आणि त्यांचा मृत्यू हे मुद्दे लक्षात घेतले जातात.