खरगोन: मध्य प्रदेशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अर्थात मनरेगा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. मनरेगाच्या जॉब कार्डवर चक्क अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि जॅकलिन फर्नांडिसचा फोटो असल्याचं समोर आलं आहे.
खरगोन जिल्ह्यातील झिर्निया पंचायत विभागातील पिपरखेडा नाका या दुर्गम खेड्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. नरेगाच्या लाभार्थ्य़ांच्या जॉब कार्डच्या यादीत या अभिनेत्रींचा फोटो ऑनलाईन अपलोड करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या अभिनेत्रींनी जून आणि जुलै महिन्याचे वेतन घेतले असल्याची नोंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी कुटुंबातील पुरुषाच्या नावासमोर या अभिनेत्रींचा फोटो असल्याचं दिसून येतंय. तर अनेक कार्ड फेक असल्याचं समोर आले आहे.
या प्रकारावरुन त्या खेड्यातील अनेक लोकांना धक्का बसला आहे. त्यांनी या सर्व प्रकाराला पंचायत सचिव आणि अधिकाऱ्यांना जबाबादार धरले आहे. एका व्यक्तीने यावर सांगितले की तो याआधी कधीच नरेगाच्या कामावर गेला नाही पण त्याच्या नावावर जॉब कार्ड आहे आणि त्यावर दिपीकाचा फोटो आहे. ही गोष्ट त्याच्यासाठी धक्का देणारी आहे असेही त्याने सांगितले.
तात्काळ चौकशी करण्याचे आदेश
एका कुटुंबाच्या जॉब कार्डवर जॅकलिनचा फोटो अपलोड केला आहे. त्यावर त्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की त्यांच्याकडे या जॉब कार्डची ओरिजनल कॉपी आहे. ज्यावर त्यांचा स्वत:चा फोटो आहे. जॅकलिनचा फोटो नंतर कोणीतरी ऑनलाईन अपलोड केल्याचा आरोप त्यांनी केला. खरगोनच्या जिल्हाधिकारी अनुग्रह पी. यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या घटनेची तात्काळ चौकशी करण्य़ाचे आदेश दिले आहेत. प्रत्येक जॉब कार्ड तपासले जाईल आणि त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
खरगोनच्या जिल्हा परिषदेचे सीईओ गौरव बेनल यांनी सांगितले की या घटनेची चौकशी करण्यासाठी एक टीम पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 11 जॉब कार्डबाबत अशी तक्रार आली आहे. त्यावर बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा फोटो असल्याचं लक्षात आलंय. त्यांच्या नावावर जून आणि जुलै महिन्यातील वेतनही काढण्यात आले आहे.
पुरूषांच्या नावासमोरही अभिनेत्रींचे फोटो
या खेड्यात मनरेगाच्या तलाव आणि कॅनॉल तयार करण्याच्या कामावर काही गावकरी काम करत होते. त्यांनी काम करुनदेखील त्यांचे वेतन निघत नव्हते. यासाठी त्यांनी नरेगाच्या पोर्टलवर चेक केले असता त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली. अनेकांच्या जॉब कार्डवर या अभिनेत्रींचे फोटो होते. काही पुरूषांच्या नावासमोरही या अभिनेत्रींचे फोटो होते. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की त्याच्यापैकी अनेकांनी या आधी कधीच नरेगाच्या कामासाठी अर्ज केला नव्हता पण त्यांचे नाव त्या यादीत समाविष्ट आहे.
मनरेगा योजना तिच्या सुरवातीपासूनच भ्रष्टाचाराच्या घटनांवरून सतत चर्चेत आहे. असे असले तरी या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक लोकांना रोजगार मिळालाय. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित कामगार आणि ग्रामीण भागातील लोकांकडे पैसा हस्तांतरित करण्यात नरेगा योजनेने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे.