India Rain News: यावर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात झाली, तेव्हापासून देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.  हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनला मान्सून सुरू झाल्यापासून भारतात 749 मिमी पाऊस झाला आहे. तर या कालावधीत सामान्य पाऊस 701 मिमी आहे.
तर ऑगस्टमध्ये भारतात सरासरीपेक्षा 16 टक्के अधिक पाऊस झाला आहे.


देशात ऑगस्टमध्ये 287.1 मिमी पावसाची नोंद


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. मागील ऑगस्ट महिन्यात तर देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल आहे. उत्तर-पश्चिम भारतात 253.9 मिमी पावसाची नोंद झाली, जी 2001 नंतर ऑगस्टमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ऑगस्टमध्ये 287.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर साधारणपणे 248.1 मिमी पाऊस पडतो. एकूणच, 1 जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून भारतात 749 मिमी पाऊस झाला आहे, तर या कालावधीत सामान्य पाऊस 701 मिमी आहे.


हिमालयाच्या पायथ्यासह ईशान्येकडील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस 


हिमालयाच्या पायथ्याशी आणि ईशान्येकडील अनेक जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडला आहे. कारण बहुतेक कमी दाब प्रणाली त्यांच्या सामान्य स्थितीपासून दक्षिणेकडे सरकल्या आणि मान्सूनचा प्रवाह देखील त्याच्या सामान्य स्थितीपासून दक्षिणेकडे राहिल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रातील विदर्भासह अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे.


सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. देशातील जवळफास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 'ला' निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा (Monsoon) मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : वीज, वादळ वारा सुटणार, आज महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, हवामान विभागानं दिला इशारा