नवी दिल्ली : भारतीय टपाल खातं देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक बनण्यासाठी सज्ज झालं आहे. 1 एप्रिल म्हणजे आजपासून देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक आपल्या अनेक सेवांना सुरुवात करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मोफत दिल्या जातील.


देशातील सर्व टपाल खात्यांमध्ये बँकिंग सेवा सुरु केली जाणार आहे. देशात सध्या 1.55 लाख पोस्ट ऑफिस आहेत. व्यवहारासाठी 650 पेमेंट बँक त्यांना मदत करतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचं बचत खातं, 25 हजार रुपयांवर 5.5 टक्के व्याज, चालू खातं आणि थर्ड पार्टी इन्शूरन्स अशा सुविधा मिळतील.

तुमचा आधार नंबर हाच पेमेंट अॅड्रेस असेल. सेवा सुरु झाल्यानंतर आयपीपीबी देशातील सर्वात मोठं बँकिंग जाळं म्हणून समोर येईल. पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक शहरी आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट सेवा पोहोचवणार आहेत. 2015 मध्ये भारतीय टपाल खात्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट बँक म्हणून काम करण्यासाठी मान्यता दिली होती.