Indian Astronaut on ISS : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आणि आदित्य एल-1 सारख्या अंतराळ मोहिमेद्वारे (Space Mission) भारताने जगाला आपली ताकद दाखवली आहे. गेल्या काही वर्षांत भारताने अंतराळ क्षेत्रात प्रचंड यश मिळवलं आहे. चांद्रयान-3 द्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. पण अंतराळात मानवाला पाठवणं अजूनही भारताला जमलेलं नाही. अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा होते. 1984 मध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती. अंतराळ मानव पाठवणं भारताच्या अद्याप आवाक्याबाहेर आहे. हेचं स्वप्न उरी बाळगून आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो नव्या मोहिमेच्या तयारीला लागली आहे. आता पुन्हा एकदा भारत आपले अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये ही मोहिम हाती घेतली जाईल. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि इस्रोचं हे संयुक्त मिशन असेल. (ISRO NISAR Update)


ISRO ची नव्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज!


इस्रो (ISRO) आणि नासा (NASA) येत्या वर्षात महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करणार आहे. नासा प्रमुख बिल नेल्सन यांनी मंगळवारी 28 नोव्हेंबरला याबाबत घोषणा आहे. त्यांनी सांगितलं की, अमेरिका 2024 च्या अखेरीस भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवण्यात मदत करेल. त्यांनी पुढे सांगितलं की, 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) माध्यमातून अंतराळवीरांची निवड केली जाईल. यामध्ये नासा (NASA) ची कोणतीही भूमिका नसेल. मोहिमेसंदर्भात इतर तपशीलांवर काम सुरु आहे. भारत-अमेरिका अंतराळ सहकार्य वाढवण्यासाठी नासा प्रमुख बिल नेल्सन सध्या भारतात आले आहेत.


चांद्रयान मोहिमेसाठी अभिनंदन


नासा प्रमुख बिल नेल्सन यांनी चांद्रयान मोहिमचं अभिनंदन करत म्हटलं की, 'भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा भागीदार आहे आणि अंतराळातील अंतराळवीरांशी संबंधित उपक्रममध्येही भारत चांगला साथीदार आहे. अमेरिका पुढील वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक खाजगी लँडर्स पाठवणार आहे. पण, वस्तुस्थिती पाहता, चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे, त्यामुळे भारत अभिनंदनास पात्र आहे. अमेरिकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत नेल्सन यांनी अंतराळ मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. यावेळी चांद्रयान-3 साठी त्यांनीही अभिनंदनही केलं आहे.


अमेरिका भारताला करणार मदत


टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बिल नेल्सन यांनी सांगितलं आहे की, जर भारताला अंतराळात आपले पहिले स्पेस स्टेशन बनवायचे असेल तर, अमेरिका त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहे. बिल नेल्सन म्हणाले की, ''मला वाटते की भारताला 2040 पर्यंत एक व्यावसायिक अंतराळ स्थानक तयार करायचं आहे. भारताला आमच्यासोबत काम करायचं असेल तर, आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत. पण ते पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे.''


निसार उपग्रह भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहिम


नेल्सन पुढे म्हणाले की, नासा भारतासोबत पुढील अंतराळ मोहिमेची योजना करण्यास तयार आहे. पण ते इस्रोवर अवलंबून आहे. नेल्सन यांनी अंतराळ मंत्री जितेंद्र सिंग यांना नासाच्या रॉकेटवर भारताच्या पहिल्या अंतराळवीराला ISS वर पाठवण्यासंबंधी कार्यक्रमाला गती देण्याचे आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहिम असलेला सर्वात महागडा उपग्रह NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) पुढील वर्षी प्रक्षेपित करणार आहेत. त्याची किंमत एक अब्ज डॉलर्स आहे.