26 Fingers Girl: राजस्थानशी संबंधित एक बातमी सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) एका मुलीचा जन्म झाला, जिला एक-दोन नव्हे तर तब्बल 26 बोटं आहेत. राजस्थानच्या डीग जिल्ह्यातून ही अनोखी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या मते ही अत्यंत दुर्मिळ घटनांपैकी एक आहे. नवजात बाळाच्या प्रत्येक हाताला सात बोटं आणि प्रत्येक पायाला सहा बोटं आहेत, या घटनेमुळे बाळाच्या कुटुंबासह डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले आहेत.


देवीचा अवतार असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं


जगात अशा काही गोष्टी घडतात ज्यावर डोळ्यांनाही विश्वास बसत नाही, पण त्या खऱ्या घटना असतात. अशीच ही घटना राजस्थानमध्ये घडली. स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी बाळाची अतिरिक्त बोटं (Extra Fingers) ही पॉलीडॅक्टिली नावाच्या अनुवांशिक विकारामुळे असल्याचं सांगितलं. बाळाला अतिरिक्त बोटं असणं ही एक दुर्मिळ घटना आहे, जी बाळाच्या आरोग्याला लक्षणीयरीत्या कोणतीही हानी पोहोचवत नाही, डॉ. बी. एस. सोनी यांनी हे आश्वासन दिलं आहे.


तथापि, या दुर्मिळ घटनेने कुटुंबात आध्यात्मिक वातावरण बनवलं आहे. डॉक्टर याला अनुवांशिक विसंगती मानत आहेत. मात्र बाळाच्या कुटुंबाचा ठाम विश्वास आहे की ते ज्या देवीची पूजा करतात, ती ढोलगड देवी कन्येच्या रुपात अवतरली आहे. यामुळे बाळाची आई आणि संपूर्ण कुटुंबीय खूप आनंदी आहेत.


डॉक्टर सांगत आहेत विज्ञानाचे चमत्कार


गोपीनाथ मोहल्ला येथे राहणाऱ्या गोपाल भट्टाचार्य यांची 8 महिन्यांची गर्भवती पत्नी सरजू देवीला 16 सप्टेंबरच्या रात्री अचानक प्रसुतीच्या वेदना होत होत्या. यानंतर तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात तिला नेण्यात आलं आणि रात्री उशिरा बाळाचा जन्म झाला. डॉक्टर हा विज्ञानाचा चमत्कार असल्याचं सांगत आहेत.


डॉ.सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळ आणि त्याची आई सरजू देवी या दोघांची प्रकृती ठीक आहे. नवजात मुलाचे मामा दीपक यांनी हे मूल त्यांच्या कुटुंबात देवी लक्ष्मीच्या रुपात अवतरलं आहे, असं मानत आहेत. ते म्हणाले, "आमच्यासाठी ती देवी म्हणून आमच्या घरात आली आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आमच्या कुटुंबात 'लक्ष्मी'चा जन्म झाला आहे."


ही एक अत्यंत दुर्मिळ केस - डॉ. बी.एस. सोनी


कामा हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ.बी.एस.सोनी यांनी सांगितलं की, ही अत्यंत दुर्मिळ केस आहे. 26 बोटं असण्यात कोणत्याही प्रकारची हानी नाही. परंतु, अनुवांशिक विसंगतीमुळे हे घडतं. तर जन्मलेली मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. या महिलेची ही दुसरी मुलगी आहे.


हेही वाचा:


महिलेनं दत्तक घेतली 13 मुलं; दिसायला एकदम खरी, पण त्यामागील सत्य काही वेगळंच...