नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सांवरलाल जाट यांचं आज (बुधवार) सकाळी निधन झालं. सांवरलाल जाट काही दिवसांपासून आजार होते आणि त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.


सांवरलाल जाट मोदी सरकारमध्ये जलसंवर्धन राज्यमंत्री होते. के 62 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1955 रोजी झाला होता.

22 जुलै रोजी जयपूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालली बैठकीत सांवरलाल जाट बेशुद्ध पडले होते. प्रकृती बिघडल्यामुळे तातडीने अॅम्बुलन्स बोलावण्यात आली. त्यानंतर सांवरलाल जाट यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र 27 जुलै रोजी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये हलवण्यात आलं होतं. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सांवरलाल जाट यांना एम्समध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती.

सांवरलाल जाट यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सचिन पायलट यांचा पराभव केला होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सांवरलाल जाट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विटरवर आपल्या भावनांना वाट केली

https://twitter.com/narendramodi/status/895130135137046528

कोण होते सांवरलाल जाट?
सांवरलाल जाट हे अजमेरमधून लोकसभा खासदार होते. मोदी सरकार ते जलसंवर्धन राज्यमंत्रीही होते. 9 नोव्हेंबर 2014 पासून 5 जुलै 2016 पर्यंत त्यांनी जलसंवर्धन राज्यमंत्री म्हणून केंद्रात काम केलं.

सांवरलाल यांचा जन्म 1 जाने 1955 रोजी राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील गोपालपुरा गावात झाला होता. वाणिज्य शाखेत पदव्युत्त शिक्षण घेतल्यानंतर राजस्थान विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केलं. अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

1993, 2003 आणि 2013 मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये मंत्रीही होते. 2014 मध्ये अजमेरमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना केंद्रात राज्यमंत्री बनवण्यात आलं. परंतु मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं होतं.