नवी दिल्लीः दिल्ली आणि बेंगलोर या शहरात वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे ही दोन्ही महानगरं भारतातील सर्वात प्रदूषित आहेत, असं समोर आलं आहे. आतापर्यंत सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत देशाची राजधानी दिल्लीचा अव्वल नंबर लागत होता. मात्र आता बेंगलोरचाही त्यात समावेश झाला आहे.
बेंगलोर शहरात रस्त्यावर दररोज 61 लाख गाड्या धावतात. तर दिल्लीमध्ये देशात सर्वात जास्त 88 लाख वाहनं धावतात, असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.
या दोन शहरांपाठोपाठ अनुक्रमे चेन्नई, कोलकाता आणि मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो. चेन्नईमध्ये 44.7 लाख, कोलकातामध्ये 38.6 लाख आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये रस्त्यावर दररोज 27 लाख वाहने धावतात.
बेंगलोर शहरात एक लाख कॅब
कॅब टॅक्सी हा बेंगलोर शहरामध्ये प्रमुख व्यवसाय बनला असल्याचंही बोललं जात आहे. उबेर आणि ओला कॅब चालवणे हा अनेकांचा जोडधंदा बनला आहे. त्यामुळे शहरात कॅबची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शहरात सध्या तब्बल 1 लाख 8 हजार कॅब असून हा आकडा देशातील सर्वात मोठा आकडा आहे. बेंगलोर शहरातील 11 आरटीओ कार्यालयात या वर्षात जवळपास 24 हजार कॅबची नोंदणी करण्यात आली आहे. बेंगलोर शहरातील वाढत्या वाहनांच्या आकड्याला कॅबची वाढती संख्याच जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.