नवी दिल्ली : भारताला स्विस बँक खात्याच्या तपशिलाचा चौथा संच मिळाला आहे. वार्षिक ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन (AEOI) अंतर्गत स्वित्झर्लंडने सुमारे 34 लाख आर्थिक खात्यांचे तपशील 101 देशांसोबत शेअर केले आहेत. या अनुसार भारताला स्वित्झर्लंडकडून प्रथम तपशील सप्टेंबर 2019 मध्ये मिळाले होते. 2019 साली स्वित्झर्लंडने त्यावेळी 75 देशांशी माहिती सामायिक केली होती. त्यानंतर दुसरा सेट सप्टेंबर 2020 मध्ये तर तिसरा सेट 2021 मध्ये मिळाला होता.


गैरकृत्यांचा तपासात डेटा उपयुक्त ठरेल


भारतासोबत शेअर केलेले तपशील अनेक खात्यांसह शेकडो आर्थिक खात्यांशी जोडलेले आहेत. या डेटाचा वापर करचोरी, मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग यांसारख्या गैरकृत्यांचा तपास करण्यासाठी केला जाईल. गेल्या महिन्यात या डेटाची देवाणघेवाण झाली आणि पुढील माहितीचा संच स्वित्झर्लंडद्वारे सप्टेंबर 2023 मध्ये उघड केला जाईल.


नाव-पत्त्यापासून खात्यातील शिल्लक माहितीपर्यंत


डेटा संरक्षण आणि गोपनीयतेसाठी भारतात आवश्यक असलेल्या कायदेशीर फ्रेमवर्कच्या पुनरावलोकनासह दीर्घ प्रक्रियेनंतर स्वित्झर्लंडने भारतासोबत ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन माहिती अदानप्रदान करण्यास सहमती दर्शविली होती.या डेटाच्या तपशीलांमध्ये नाव, पत्ता, राहण्याचा देश आणि टॅक्स तथा करासाठीचा ओळख क्रमांक तसेच खात्यातील शिल्लक आणि भांडवली उत्पन्नाशी संबंधित माहिती देण्यात आलेली आहे.


व्यावसायिकाशी संबंधित बहुतेक तपशील


भारताला मिळालेला ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन (AEOI) डेटा बेहिशेबी मालमत्ता असलेल्यांविरुद्ध मजबूत खटला उभारण्यासाठी खूप उपयुक्त ठरला असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या डेटामध्ये ठेवी आणि हस्तांतरण तसेच सर्व कमाईची संपूर्ण माहिती असते. सिक्युरिटीज आणि इतर मालमत्तेतील गुंतवणुकीचा समावेश असतो.


यामधील बहुतांश तपशील व्यावसायिकाशी संबंधित आहेत. यामध्ये अनिवासी भारतीयांचा तपशील देखील समाविष्ट आहे. जे अनिवासी भारतीय आता अनेक दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये तसेच यूएस, यूके आणि काही आफ्रिकन आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये स्थायिक झाले आहेत अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिली आहे.


पाच नवीन देशांचा समावेश 


फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशनने (FTA) याबाबत माहिती देताना, या वर्षी माहितीच्या सामायिकीकरणाच्या यादीत पाच नवीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी अल्बानिया, ब्रुनेई दारुसलाम, नायजेरिया, पेरू आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. यासोबतच आर्थिक खात्यांची संख्या सुमारे एक लाखाने वाढलेली आहे.


स्विस खाते म्हणजे काय?


स्वित्झर्लंडमधील सर्व बँकांना स्विस फेडरल बँकिंग कायद्याच्या गोपनीयता कायद्याच्या कलम 47 अंतर्गत बँक खाती उघडण्याचा अधिकार आहे. मात्र स्वित्झर्लंडमध्ये कोणी गुन्हा, अपराध केला नसेल तर बँकेकडून त्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. मात्र, 2017 मध्ये जागतिक समुदायाच्या दबावानंतर कायद्यात शिथिलता आणण्यात आली आणि माहितीची देवाणघेवाण सुरू झाली.