Indian Air Force In Jammu Kashmir: चिनी ड्रॅगन (China) आणि पाकिस्तानची (Pakisthan) झोप उडणार आहे. कारण आता जम्मू-काश्मिरच्या (Jammu and Kashmir) आकाशात मिग-29 गस्त घालणार आहे. भविष्यातील सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय हवाई दलानं मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात संरक्षण परिस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशानं हवाई दलानं श्रीनगर विमानतळावर प्रगत मिग-29 लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला आहे.
जम्मू-काश्मीर पाकिस्तान आणि चीनच्या सीमेला लागून आहे. अशा स्थितीत येथील एअरबेसवर लढाऊ विमानं तैनात करण्याबाबत खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. भारताच्या पाकिस्तानच्या उत्तरेकडील सीमेचं रक्षण करणारे ट्रायडंट स्क्वॉड्रन श्रीनगरमधील या तळावर तैनात करण्यात आलं आहे. ट्रायडंट्स स्क्वॉड्रनला सैन्यात 'उत्तरचे रक्षक' असंही म्हणतात.
काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर हवाई दलाच्या बेसवर आता मिग-29 ही लढाऊ विमानं सज्ज करण्यात आली आहेत. या एअरबेसवर आतापर्यंत मिग-21 विमानं सज्ज होती. त्यामुळे आता चिनी हालचालींवर मिग-29 विमानांची नजर राहणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालकोटमध्ये एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला झटका दिला होती. त्यानंतर पाकिस्तानने एफ-16 विमानांनी भारतावर हल्ल्याच प्रयत्न केला होता. मात्र, मिग-21 विमानांनी एफ-16 विमानांचा हल्ला परतावून लावला होता. या मिग-21 विमानांची जागा आता मिग-29 विमानांनी घेतली आहे. तत्पूर्वी मिग-29 विमानांच्या प्रणालीत अनेक बदल करून त्यांचं नामकरण उन्नत मिग-29 यूपीजी असं करण्यात आलं आहे.
मिग-29 तैनात करण्यासंदर्भात हवाई दलाचं म्हणणं काय?
भारतीय वायुसेनेचं स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात असलेल्या श्रीनगर एअरबेसची उंची मैदानी भागापेक्षा जास्त आहे. इथे दोन्ही चीन आणि पाकिस्तान देशांची सीमाजवळ आहे, अशा परिस्थितीत अल्पावधीतच वेगवान प्रतिसाद देणार्या विमानांची गरज होती. मिग-29 हे विमान यासाठी योग्य आहे. कारण त्यामध्ये या परिस्थितीसाठी उत्तम विमान आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आहेत.
मिग-29 ची वैशिट्य काय?
हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मिग-29 मध्ये संघर्षाच्या वेळी शत्रूच्या लढाऊ विमानांना ठप्प करण्याची क्षमताही आहे. हे विमान रात्री उड्डाण करताना लष्कराच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे.
मिग-29 हे लढाऊ विमान किती शक्तिशाली?
मिकोयान मिग-29 हे सोव्हिएत युनियनमध्ये डिझाइन केलेलं दुहेरी इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे. हे मिकोयान डिझाईन ब्युरोनं 1970 च्या दशकात हवाई श्रेष्ठता लढाऊ विमान म्हणून विकसित केलं होतं.