India Coronavirus Updates : देशात 8 महिन्यांनी 14 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 13,596 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 166 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात 19,582 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या 230 दिवसांनी सर्वात कमी झाली आहे. 


देशातील कोरोना संसर्गाची स्थिती 


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 40 लाख 81 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 52 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 39 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. एकूण 1 लाख 89 हजार 694 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. 






देशातील कोरोनाची एकूण आकडेवारी : 


कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 40 लाख 81 हजार 315
एकूण कोरोनामुक्त : तीन कोटी 34 लाख 39 हजार 331
एकूण सक्रिय रुग्णसंख्या : एक लाख 89 हजार 694
एकूण मृत्यू : चार लाख 52 हजार 290
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 97 कोटी 79 लाख 47 हजार डोस 


मुंबईत काल 'शून्य' कोरोना मृत्यू; तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवसांवर


देशासह राज्यातीलही कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावताना पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी यामागील प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काल (रविवारी) राज्यात 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद (Coronavirus) झाली. तर  2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, काल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच संपूर्ण राज्याचा विचार केला तर तुलनेनं मुंबई शहरात सर्वाधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. अशातच कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पहिल्यांदाच मुंबईत कोरोनाची झीरो डेथ नोंदवण्यात आली आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासांत 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,27,084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत 5030 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर 1214 दिवसांवर गेला आहे.


राज्यात काल (रविवारी) 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 19 हजार 687 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.39 टक्के आहे. दरम्यान, राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 28 हजार 631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


कोरोनाच्या जिनोम सिक्वेसिंगचे धक्कादायक निष्कर्ष समोर 


कोरोनाच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीतील एकूण 343 नमुन्यांमध्ये 'डेल्टा व्हेरिअंट' चे 54 टक्के, 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह'चे 34 टक्के तर इतर प्रकारांचे 12 टक्के रुग्ण आढळून आल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण अंतर्गत हे तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष आहेत. कोविड प्रतिबंधक लस घेणं, प्रतिबंधात्मक निर्देशांचे कठोर पालन आवश्यक असल्याचं अधोरेखित झालं आहे. कोविड-19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :