Coronavirus Second Booster Dose : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्र सरकारची आरोग्य तज्ज्ञ समिती कोविड-19 प्रतिबंधात्मक लसींच्या बूस्टर डोसच्या गुणवत्तेवर विचार करत आहे. दुसरा बूस्टर डोस घेण्याबाबत सरकारमध्ये खलबतं सुरु आहेत. पहिला बूस्टर डोस आणि त्याचा परिणाम तसेच गुणवत्ता यांचा कालावधी तपासला जात आहे. सध्या फक्त 28 टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे.


बूस्टर डोस घेण्याचे सरकारचे आवाहन


कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता, केंद्र सरकारकडून नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. भारताने जानेवारी 2022 मध्ये कोविड लसीचा बूस्टर देण्यास सुरुवात झाली. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप एक्सपर्टने सांगितले आहे की, केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञ समितीकडून दुसरा बूस्टर डोसचा घेण्याची गरज आहे का, यावर विचार केला जात आहे. याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व वैज्ञानिक डेटाचा बारकाईने अभ्यास करण्यात येईल.


4 ते 6 महिन्यांत रोगप्रतिकारशक्ती कमी होते


संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती साधारणपणे चार ते सहा महिन्यांनी कमी होते. तसेच बूस्टर डोस गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत करतो. तज्ज्ञ आता दुसरा बूस्टर डोस म्हणजे कोविड लसीचा चौथा डोस घेण्याबाबत आरोग्य प्रशासनाचं निरीक्षण सुरु आहे. याबाबत अधिक माहिती येत्या काळात समोर येईल.


चौथा डोस सुरू करण्याची डॉक्टरांची मागणी


काही डॉक्टरांनी कोविड लसीचा चौथा डोस म्हणजे दुसरा कोविड बूस्टर डोस सुरु करण्याची मागणी केली आहे. अधिक जोखीम असलेल्या लोकांसाठी जसे की आरोग्य सेवा कर्मचारी, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी दुसरा बूस्टर डोस देण्याची विनंती करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी 26 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना दुसऱ्या बूस्टर डोसबाबत सांगितले आहे. आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी सुमारे एक वर्षापूर्वीच कोविड लसीचा तिसरा डोस देण्यात आला होता.


यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. जे.ए. जयलाल उपस्थित होते. डॉ जे.ए. जयलाल यांनी सांगितले की, 'आम्ही आरोग्यमंत्र्यांना नागरिकांसाठी, विशेषत: डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगार ज्यांना रुग्णांचे व्यवस्थापन करावे लागते आणि ज्यांना संसर्गाचा जास्त धोका असतो त्यांच्यासाठी दुसरा कोविड बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.


बूस्टर डोस देण्यावर सरकारचा भर


केंद्र सरकारकडून सध्या बूस्टर डोस देण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. सध्या केंद्र सरकारचे लक्ष तिसऱ्या डोसचे देण्याचे प्रमाण वाढविण्यावर आहे. आतापर्यंत देशातील फक्त 28 टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतला आहे. केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्याने सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, 'दुसऱ्या बूस्टर डोसबाबच चर्चा सुरु आहे, पण अद्याप सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या सरकारचे लक्ष्य अधिकाधिक नागरिकांना पहिला बूस्टर डोस देणे हे आहे.'