Coronavirus Cases Today: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या (Covid-19) वाढत्या संख्येनं धाकधूक वाढवली होती. सलग चार दिवस देशात 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची (Corona Updates) नोंद केली जात होती. अशातच आज मात्र नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 9111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. या वाढीसह देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 60313 वर पोहोचली आहे. 


दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत या राज्यांची सरकारंही सतर्क झाली आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णसंख्या 0.13 टक्के, रिकव्हरी रेट 98.68 टक्के आणि संसर्ग दर 8.40 टक्के आहे. तर, संसर्गाचे प्रमाण 4.94 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 


राजधानी दिल्लीत सर्वाधिक प्रादुर्भाव 


राज्यनिहाय कोरोना आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर, दिल्लीत सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत एकूण 666 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, हरियाणामध्ये 404, केरळमध्ये 367 आणि उत्तर प्रदेशमध्ये 355 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारीही चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत एकूण 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये झाले आहेत. येथे सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे चार, दिल्ली आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, महाराष्ट्रात दोन, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिक


सध्या देशभरात कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची 57 हजारांच्या पुढे गेली आहे.  तर गेल्या 24 तासांत 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि कोरोना नियमांचं पालन होत असतानाही महाराष्ट्रासह केरळ, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे.  गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 93 रुग्ण सापडले. तर मुंबईत काल दिवसभरात 182 रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना आता खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Corona Update: महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंमध्ये 71 टक्के ज्येष्ठ नागरिक, रविवारी 650 नव्या रुग्णांची नोंद