Corona Update Today : देशभरात आतापर्यंत तीन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तीन लाख 90 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 50,848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1358 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. काल दिवसभरात 68,817 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी सोमवारी 42,640 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 28 हजार 709
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 89 लाख 94 हजार 855
एकूण सक्रिय रूग्ण : 6 लाख 43 हजार 194
एकूण मृत्यू : 3 लाख 90 हजार 660


देशात सलग 41व्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 22 जूनपर्यंत देशभरात 29 कोटी 46 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 54 लाख 24 हजार लसीचे डोस देण्यात आले. तसेच आतापर्यंत 39 कोटी 59 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन 3 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या यादीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतप सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 


डेल्टा प्लस व्हेरिएंट 'चिंताजनक' घोषित, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र सरकारचा अलर्ट


देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रसारामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा मोठा हातभार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर आता कुठे नियंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट (Variant of Concern) जाहीर केलं आहे. तसेच या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासहित 80 देशांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्यप्रदेशमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या राज्यांना अलर्ट केलं जात आहे. 


राज्यात मंगळवारी नव्या बाधितांहून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,42,258 इतकी झालीय. आज 188 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे.


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.9 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 188 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,98,86,554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,87,521 (15.01टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,58,863 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  काल रोजी एकूण 1,23,340 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


मुंबईत कोरोना रुग्णवाढ दुपटीचा वेग 722 दिवसांवर


मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेला आहे. मंगळवारी मुंबईत कोरोनाचे 570 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 742 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे मंगळवारी 10 रुग्णांचा मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :