India Coronavirus Updates : केरळात कोरोनाचं संकट गडद होताना दिसत आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. सलग चौथ्या दिवशी देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 45,083 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 460 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 तासांत 35,840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


आजचा सलग चौथा दिवस आहे, जेव्हा देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी 46164, शुक्रवारी 44658, शनिवारी 46759 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशातील एकूण दैनंदिन कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण केरळातील आहेत. केरळात सलग चौथ्या दिवशी शनिवारी कोरोना व्हायरसच्या 30 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर एकूण 39 लाख 77 हजार 572 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी 


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 26 लाख 95 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 4 लाख 37 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 18 लाख 88 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 68 हजार रुग्ण अद्याप कोरोनावर उपचार घेत आहेत. 


देशातील सध्याची कोरोनास्थिती


कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 26 लाख 95 हजार 30
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 18 लाख 88 हजार 642
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 68 हजार 558
एकूण मृत्यू : चार लाख 37 हजार 830
एकूण लसीकरण : 63 कोटी 9 लाख 17 हजार लसीचे डोस


महाराष्ट्रात काल (शनिवारी) 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


राज्यात काल (शनिवारी) 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 455 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 59 हजार 906 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे. 


राज्यात काल (शनिवारी) 126 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 40 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 821 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,054 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (42), नंदूरबार (2),  धुळे (19), जालना (33), परभणी (30), हिंगोली (59),   नांदेड (29),  अकोला (22), वाशिम (03),  बुलढाणा (50), यवतमाळ (07), नागपूर (75),  वर्धा (5), भंडारा (8), गोंदिया (4),  गडचिरोली (32) या सतरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :