India China Trade Relations : भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील सीमावाद सर्वज्ञात आहे. 'ड्रॅगन'कडून सातत्याने सीमेवर कुरापती सुरु असतात. याला भारत चोख प्रत्युत्तर देतो. भारत-चीन सीमेवर एकीकडे तणाव पाहायला मिळत असताना भारत-चीनमधील व्यापारामध्ये वाढ झाली आहे. नुकताच भारत आणि चीनममध्ये तवांग सेक्टरमध्ये संघर्ष झाला. यानंतर भारत-चीन यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. मात्र दुसरीकडे भारताचे चीनसोबत व्यापारी संबंध आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने चीनसोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची भावना व्यक्त होत आहे.


चीनमधून भारतात विक्रमी आयात


मागील अडीच वर्षात भारत आणि चीनमधील व्यापारात विक्रमी वाढ झाली आहे. भारत-चीन सीमेवर एकीकडे तणाव पाहायला मिळत असताना गेल्या 30 महिन्यांमध्ये चीनमधून भारताने विक्रमी आयात केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, चीनमधून भारताची आयात गेल्या 30 महिन्यांत विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. चीनमधून सरासरी मासिक आयातीचा आकडा 2020-2021 मध्ये 5.43 अब्ज डॉलर होता. या आकडा 2021-2022 मध्ये 7.88 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.


लॉकडाउननंतर वाढला व्यापार


अहवालावर आधारीत माहितीनुसार, भारत-चीन यांच्यातील व्यापारात अलीकडची भरभराट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत शेजारील देशातून होणाऱ्या आयातीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे आहे. लॉकडाउननंतर भारत-चीन व्यापारात वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊन दरम्यान भारताची चीनमधील आयात जून 2020 मध्ये 3.32 अब्ज डॉलरच्या नीचांकी स्तरावर पोहोचली होती. पण कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर यामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. चीनमधून जुलै 2020 मध्ये 5.58 अब्ज डॉलर मासिक आयात झाली. ते प्रमाण सातत्याने वाढत आहे. या वर्षी जुलैमध्ये 10.24 अब्ज डॉलर मासिक आयात विक्रमी उच्चांकावर पोहोचली. सध्या हा आकडा पंतप्रधान मोदी यांच्या देशांतर्गत उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाच्या अगदी विरुद्ध आहे.


भारत-चीन व्यापारात 34 टक्क्यांची वाढ


वर्षभरात भारत-चीन व्यापारात 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, मार्च 2022 पर्यंत भारत आणि चीनमधील व्यापार 34 टक्क्यांनी वाढून 115.83 बिलियन डॉलरवर पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यातील व्यापार 69.04 बिलियन डॉलर आहे. वाणिज्य मंत्रालयायाने संसदेत ही आकडेवारी जाहीर केली होती.


भारताने 2021-2022 मध्ये चीनसोबतच्या व्यापाराचा 115.83 अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला. हा आकडा 2020-2021 मधील 86.39 अब्ज डॉलरपेक्षा 34.06 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2010-2011 नंतरची भारताची चीनसोबतच्या व्यापारातील सर्वाधिक वाढ झाली. हा आकडा 35.82 टक्के होता.


भारताचा चीनसोबतचा व्यापार वाढताच


2021-2022 मध्ये भारताचा एकूण व्यापार 1035 अब्ज डॉलर होता. या काळात चीन हा भारताचा अमेरिकेनंतरचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांसोबतच्या व्यापारातील मोठा फरक दिसून आला की, अमेरिकेसोबत भारताचा व्यापार 32.85 अब्ज डॉलर होता तर, चीनसोबतचा व्यापार  73.31 अब्ज डॉलर होता. 2021-2022 दरम्यान भारताचा चीनसोबतचा व्यापार  गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे.