नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शीन जिनपिंग यांची 17 नोव्हेंबरला ब्रिक्सच्या बैठकीत समोरासमोर भेट घेऊ शकतात. 17 नोव्हेंबर रोजी ब्रिक्स देशांची व्हर्च्युअल बैठक पार पडणार आहे. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात पाच महिन्यांपासून तणावपूर्ण स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवरही परिणाम झाला आहे. वादामुळे दोन्ही देशांवर परिणाम होणार हे स्पष्ट आहे. हीच बाब ओळखून वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी मुत्सद्दी व सैनिकी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.
दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये 12 ऑक्टोबर रोजी चर्चेची अजून एक फेरी सुरू होणार आहे. ज्याचा अजेंडा खासकरुन वादग्रस्त मुद्द्यांवरून सैन्य मागे घेण्याची रूपरेषा ठरवण्याचा असणार आहे.
कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारताने या उंचीच्या भागात आधीच हजारो सैनिक आणि सैन्य उपकरणे तैनात केली आहेत. भारतीय वायुसेनेने आधीच सुखोई 30 एमकेआय, जग्वार आणि मिरज 2000 सारखी लढाऊ विमानं पूर्व लडाख आणि वास्तविक नियंत्रण रेषेवरील इतर ठिकाणी तैनात केली आहेत.
काही दिवसांपूर्वीच पूर्व लडाखमध्ये हवाई दलातील प्रमुख पाच राफेल लढाऊ विमान नियमितपणे उड्डाण करत आहेत. हवाई सैन्याने रात्रीच्या वेळी पूर्वेकडील लडाख प्रदेशात लढाऊ हवाई गस्त देखील केली आहे. जेणेकरून या पर्वतीय प्रदेशातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असल्याचे चीनला दाखवून देता येईल.
दोन्ही देशांमध्ये 21 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सैन्य चर्चेत दोन्ही देशांनी सीमेवर आणखी सैन्याला न पाठवणे किंवा परिस्थिती आणखी बिघडेल असं कोणतंही पाऊल उचलू नये यासाठी उपाय जाहीर केले होते.