India China LAC : भारतीय लष्कराचे नवे प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. चीनसोबतच्या संबंधांमध्ये सीमा विवाद हा प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले, जनरल पांडे म्हणाले की, शेजारचा देश भारत-चीन सीमा विवाद गुंतागुंतीचा ठेवू इच्छित आहे. नुकतीच लष्कराची सूत्रे हाती घेतलेल्या जनरल पांडे यांनी सोमवारी पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


केवळ एका बाजूच्या प्रयत्नाने हे शक्य नाही.


लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, चीनला सीमा विवाद सोडवायचा नाही असे दिसते. ते म्हणाले की, लष्कर प्रमुख या नात्याने एप्रिल 2020 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती पूर्ववत करणे, तसेच दोन्ही बाजूंमध्ये विश्वास आणि मैत्रीचे वातावरण निर्माण करणे हे त्यांचे प्राधान्य असेल. त्याचवेळी ते म्हणाले की, पण केवळ एका बाजूच्या प्रयत्नाने हे शक्य नाही. जनरल पांडे म्हणाले, पूर्व लडाखमधील lOC वर भारतीय सैन्य उभे असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तेथे पुरेसे सैन्यही तैनात करण्यात आले आहे, याची त्यांना खात्री द्यायची आहे. ते म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आमचे जवान महत्त्वाच्या पदांवर बसले आहेत, तसेच त्यांना सीमेवरील स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे.


सीमेवरील चुकीच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. 
याचबरोबर भारत आणि चीन यांच्यात चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्हाला खात्री आहे की पुढे मार्ग निघेल, पण सीमेवरील चुकीच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. दरम्यान, मूळ मुद्दा सीमारेषेच्या निराकरणाचा आहे. जनरल पांडे म्हणाले की, चर्चेने उत्तर आणि दक्षिण पेगॉन्ग तलाव, गोगरा आणि गलवान व्हॅली सारख्या भागातील समस्या सोडवल्या आहेत. सुमारे दहा दिवसांपूर्वी पदभार स्वीकारताच लष्करप्रमुखांनी चीनला खडे बोल सुनावले होते. ते म्हणाले होते की, आम्हाला विश्वास आहे की आम्ही दुसऱ्या बाजूने चर्चा करत राहिल्याने सध्या सुरू असलेल्या समस्यांवर तोडगा निघेल. मात्र त्याचवेळी सीमेवर होणारी गैरकृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत.