नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सतत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी एक ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे की, 'नरेंद्र मोदी खरंतर सरेंडर मोदी (Surender Modi) आहेत.' जपान टाईम्स या वृत्तपत्रात चीनसोबत भारताच्या धोरणाचं परीक्षण करणाऱ्या लेखाचा हवाला देत राहुल गांधींनी हे ट्वीट केलं आहे.
गुजरात निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधींना मोदींना मौत का सौदागर असं संबोधलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधी वैयक्तिक हल्ला करताना म्हणतायत सरेंडर मोदी. सोनिया गांधींनी केलेल्या वैयक्तिक टीकेची त्यावेळी उलट प्रतिक्रिया आली होती. शिवाय असे वैयक्तिक हल्ले पर्वणीसारखे वापरण्यात मोदी एकदम तरबेज आहेत.
दरम्यान, सरेंडर मोदींनंतर सध्या #ChineseGandhi आणि #राहुलमीरजाफरगांधी हे दोन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
कोणीही आपल्या सीमेत घुसखोरी केलीली नाही : मोदी
देशातल्या 20 राजकीय पक्ष प्रमुखांच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, "आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला." पण या वक्तव्यात आणि सरकारच्याच अनेक वक्तव्यांमध्ये विरोधाभास आहेत. कारण गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाचं जे अधिकृत वक्तव्य आलं होतं त्यात याच्या बरोबर विरोधी सूर आहे.
पंतप्रधान म्हणतात ते खरं की, परराष्ट्र मंत्रालय म्हणतं ते खरं हा प्रश्न निर्माण होत असतानाच मोदींच्या वक्तव्यानंतर राहुल गांधींनीही दोन प्रश्न उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनी ट्वीट करत विचारलं होतं की, 'देशबांधवांनो, चीनने हिंदुस्थानातील शस्त्रहीन सैनिकांची हत्या करत खूप मोठा गुन्हा केला आहे. मला विचारायचं आहे की, या वीर जवानांना धोका असतानाही कोणी आणि का पाठवलं? कोण जाबाबदार आहे? धन्यवाद.'
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांची मदत करणार असल्याचं सांगितलं
भारत आणि चीनमध्ये वाढणाऱ्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांची मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. ट्रम्प यांनी भारत-चीन यांच्यातील वाढणाऱ्या तणावावर बोलताना म्हणाला की, 'सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. मी चीन आणि भारत दोन्ही देशांसोबत चर्चा करत आहे. मी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे.'
दरम्यान, याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. दरम्यान, भारत आणि चीन दोन्ही देशांनीही हे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत.
सीमावाद मुत्सद्दीपणाने हाताळायला हवा : शरद पवार
गेल्या काही दशकापासून चीन त्यांच्या लष्कराची ताकद वाढवत आहे. लडाख भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य हाती घेतले आहे. पूर्व लडाख सीमा भागात चीनने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात चीन त्यांची ताकद वाढवत आहे. गलवान खोऱ्यातील मोठा भूगाग चीनने व्यापला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा वाद मिटवायचा असेल तर हा विषय मुत्सद्दीपणाने हाताळण्याचा सल्ला राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या :
सीमेवर घुसखोरी झाली नाही, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित झालेले प्रश्न!
सावधान! भारतावर चीन सायबर हल्ला करण्याची शक्यता! अनोळखी ईमेल उघडू नका