India-China Border Dispute: कुरापतखोर चीननं नवा नकाशा जारी करत अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) अक्साई चीनचाच (Aksai Chin) भाग असल्याचा दावा केला आहे. यावरुन सध्या देशासह जगभरात खळबळ माजली आहे. अशातच यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच, चीननं नकाशा जारी करत केलेला दावा अतिशय गंभीर आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावं, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
चीनच्या नव्या नकाशाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "मी सातत्यानं सांगतोय पंतप्रधान मोदी जो दावा करतायत की, लडाखमध्ये एक इंचही जमीन गेलेली नाही, हे साफ खोटं आहे. संपूर्ण लडाखला माहितीये की, चीननं आपली जमीन हडप केली आहे." एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "नकाशाबाबतची बाब अतिशय गंभीर आहे, पण त्यांनी (चीन) जमीन आधीच घेतली आहे. त्याबाबत आतातरी पंतप्रधानांनी काहीतरी बोललं पाहिजे."
चीनकडून नवा नकाशा जारी, अरुणाचल प्रदेशवर केलाय दावा
ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नव्या नकाशात भारताच्या काही भागांव्यतिरिक्त चीननं तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन सागराचाही चीनच्या भूभागात समावेश केला आहे. नकाशात चीननं नाइन-डॅश लाईनवर आपला दावा सांगितला आहे. अशा प्रकारे त्यांनी दक्षिण चीन सागराच्या मोठ्या भागावर दावा केला आहे. दरम्यान, व्हिएतनाम, फिलीपिन्स, मलेशिया आणि ब्रुनेई दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रांवर दावा करत आहेत.
चीनच्या कम्युनिस्ट सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं पोस्ट केलेला नकाशा, दक्षिण तिबेट म्हणून चीननं दावा केलेल्या अरुणाचल प्रदेश आणि 1962 च्या युद्धात ताब्यात घेतलेला अक्साई चीनचाच भाग असल्याचं दाखवलं आहे. त्याचवेळी भारतानं चीनला वारंवार सांगितलंं आहे की, अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग होता, आहे आणि राहील.
चीनला तथ्यहीन दावे करण्याची सवय : परराष्ट्र मंत्री जयशंकर
या प्रकरणावर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं की, "आपल्या मालकीच्या नसलेल्या प्रदेशांवर दावा करण्याची चीनची जुनी सवय आहे. भारताच्या काही भागांसह नकाशा जारी केल्यानं काहीही बदलणार नाही. आमचे सरकार याबाबत स्पष्ट आहे. निरर्थक दावे करून दुसऱ्याचं क्षेत्र आपलं होत नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :