नवी दिल्ली : एकीकडे चर्चेचं निमंत्रण द्यायचं आणि दुसरीकडे भारतीय सैन्यावर हल्ला करायचा... पाकिस्तानचा हा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे पाकिस्तानसोबत आयोजित चर्चा भारताने फेटाळून लावली
जम्मू काश्मिरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने सोनपतमधील जवान नरेंद्र यांच्या मृतदेहाची विटंबना केली. पाक सैन्याने नरेंद्र यांचं शिर कापून हत्या केली. पाकिस्तानच्या या दुतोंडीपणामुळे भारताने आयोजित चर्चा फेटाळून लावली.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान सहभागी होणार आहेत. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताला चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण भारतानं स्वीकारलंही.
निमंत्रणानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा होणार होती. मात्र पाकिस्तानी सैन्याने केलेल्या जवानांच्या अपमानामुळे भारताने चर्चा फेटाळली आहे. सध्याच्या परिस्थितीत ही चर्चा व्यर्थ असल्याचं भारताने सांगितलं.
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचा चेहरा अवघ्या काही दिवसातच जगासमोर आला, असं भारताने म्हटलं आहे. पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असंही गृहमंत्रालयाकडून ठणकावण्यात आलं आहे.
दुसरीकडे, जम्मू काश्मिरच्या शोपियानमधून अपहरण केलेल्या तीनही पोलिस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. अतिरेक्यांनी चार पोलिस कर्मचाऱ्यांचं अपहरण केलं होतं. त्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाला अतिरेक्यांनी सोडून दिलं. मात्र अन्य तिघा पोलिस कर्मचाऱ्यांची अतिरेक्यांनी हत्या केली.
फिरदोस अहमद, कुलदीप सिंग आणि निसार अहमद धोबी अशी हत्या करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. तर फयाझ अहमद भट याला अतिरेक्यांनी सोडून दिलं. जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरात भारतीय सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. सुरक्षा दलाला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.