नवी दिल्ली: नागरिकांची माहिती गोळा करणे, त्यांची प्रोफायलिंग करणे आणि अवैध मार्गाने ती बाहेरच्या देशातील संस्थांना पुरवणाऱ्या 348 मोबाईल अॅप्लिकेशन्स केंद्र सरकारने ब्लॉक केले आहेत. यामध्ये चीन आणि इतर देशांच्या अॅपचाही समावेश आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. 


राजीव चंद्रशेखर लोकसभेत बोलताना म्हणाले की, "ही 348 मोबाईल अॅप्स ही यूजर्सकडून अवैध मार्गाने माहिती गोळा करत होती. मिळालेल्या माहितीपासून त्यांचं प्रोफायलिंग करणे आणि अवैध मार्गाने बाहेरच्या देशात असलेल्या सर्व्हर्सकडे ही माहिती हस्तांतरित करत होते. त्यामुळे केंद्र सरकारने ती ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला."


अशा प्रकारे देशातील नागरिकांची माहिती बाहेरच्या देशात अवैधपणे हस्तांतरित करणे हे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोकादायक ठरू शकते, तसेच देशाची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या अॅप्सवर बंदी घालावी अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाने केली होती. या विनंतीची दखल घेत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या या अॅप्सपैकी काही अॅप्स हे चीनमध्ये तयार करण्यात आले आहेत अशी माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. 


काही दिवसांपूर्वीच बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया  (Battlegrounds Mobile India BGMI) या साऊथ कोरियाच्या क्रॉफ्टन या कंपनीने तयार केलेल्या प्रसिद्ध अॅपवर गुगलने बंदी घातली होती. केंद्र सरकारने आपल्याला तसे निर्देश दिले असल्याचं गुगलने सांगितलं होतं. आता त्यानंतर अशाच प्रकारच्या 348 अॅप्सवर बंदी घातली आहे. 


सप्टेंबर 2020 मध्ये क्रॉफ्टन कंपनीच्या (PlayerUnknown's Battlegrounds PUBG) आणि चीनच्या संबंधित 117 अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली होती. 


या वर्षाच्या सुरुवातीला, 14 फेब्रुवारी 2022 रोजी चीनच्या संबंधित 53 अॅप्सवर देशात बंदी घालण्यात आली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अन्वये सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली होती.