मुंबई : अनेक भारतीय ग्राहक चिनी कंपन्यांचे स्वस्त मोबाईल घेणं पसंत करतात. मात्र गुणवत्तेत मागे पडणाऱ्या चिनी उत्पादनावर बंदी घालण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. चीनकडून दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि काही मोबाईल फोनच्या आयातीवर भारताने बॅन घातला आहे.
सुरक्षिततेच्या किमान निकषांचंही पालन करु न शकणारे आणि दर्जाहीन असलेले चिनी मोबाईल फोन आता भारतात दिसणार नाहीत. भाजप खासदार भोला सिंग यांच्यासह काही सदस्यांनी लोकसभेत याबाबत प्रश्न विचारला असता वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारमन यांनी ही माहिती दिली. काही उत्पादनांची गुणवत्ता स्वीकार करण्यायोग्य नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्या मोबाईल फोनमध्ये आंतरराष्ट्रीय मोबाईल स्टेशन उपकरण ओळख क्रमांक नाही किंवा अन्य सुरक्षेच्या सुविधा नाहीत, त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्टील उत्पादनांची आयातही रोखण्यात आली आहे.
कुठल्याही देशासोबत आयातीवर पूर्ण बंदी लादणे जागतिक व्यापार संघटनेच्या निकषानुसार शक्य नाही. दोन्ही देशांचे राजनैतिक, क्षेत्रीय किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे संबंध ताणलेले असले, तरीही आयात पूर्णपणे बंद करता येत नसल्याचंही सीतारमन यांनी सांगितलं.