नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांच्या भेटीत 14 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये संरक्षण, रेल्वे, ऊर्जा, तसेच स्मार्ट सिटीसारख्या अनेक करारांचा समावेश आहे.


यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बोलताना फ्रान्ससोबत भारताच्या असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेखही केला. तसेच, जागतिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी फ्रान्सची भारताला मदत होत असल्यचंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दोन्ही देशांमधले सांस्कृतिक संबंध इतिहासापासून आहेत. संरक्षण, सुरक्षा, अंतराळ व तंत्रज्ञानात भारत व फ्रान्स यांच्यातील मैत्रीचा प्रदीर्घ वारसा दिसून येतो. सरकार कोणतेही असो, पण दोन्ही देशाचे संबंध नेहमीच वरच्या पातळीवर पोहोचलेले आहेत.”

तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांनी फ्रान्स-भारत सर्वोत्कृष्ट भागीदार असल्याचं सांगितलं. संरक्षण, संशोधन तसेच विज्ञान त्यातही तरुणांना उच्च शिक्षण-प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य करतील. शिवाय, सामरिक क्षेत्रात भागीदारीचे नवे युग सुरु करण्याचा आमचा उद्देश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी उभय देशांमध्ये 14 महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यात शिक्षण, रेल्वे, इंडो-फ्रान्स फोरम, पर्यावरण, अंतराळ, नौदल, आण्विक, स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा, मादक पदार्थांच्या तस्करीस प्रतिबंध, स्थलांतर-संपर्क, गोपनीय माहितीची सुरक्षा, सागरविषयक माहितीची देवाणघेवाण आदी महत्त्वपूर्ण करारांचा समावेश आहे.

दरम्यान, हिंदी महासागरतील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार झाला आहे. त्यानुसार दोन्ही देश आपल्या नौदल तळाचा परस्परांना वापर करू देणार आहेत. त्याबाबत सहमती झाली आहे.