INDIA Alliance March on Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाला आज (11 ऑगस्ट) संसद परिसरातच रोखण्यात आले. बिहारमधील मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवरून संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत 300 विरोधी खासदारांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. यादरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना संसद पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दिल्ली पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे जाऊ दिलं नाही. बॅरिकेडची भिंत उभा करत खासदारांना संसद परिसरातच रोखण्यात आले. यावेळी अनेक महिला खासदारांनी सुद्धा बॅरिकेड भेदून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही खासदारांसोबत धक्काबुकी झाल्याचा आरोपही करण्यात आला.
डरपोक सरकार, प्रियांका गांधींचा हल्लाबोल
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हे सरकार डरपोक असल्याचा हल्लाबोल केला. व्होट चोर गादी सोड अशी बोचरी घोषणाही प्रियांका यांनी केली. प्रियांका म्हणाल्या की, हे सरकार घाबरलं आहे. सरकार डरपोक आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतले. निदर्शनादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. यावेळीृ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांनी मदत केली.
मकरद्वार येथून मोर्चा निघाला
संसदेच्या मकर द्वार येथून मोर्चा निघाला. खासदारांनी 'मत बचाओ' चे बॅनर घेतले होते. तथापि, दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की इंडिया आघाडीने मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, म्हणून निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी, परिवहन भवनाजवळ बॅरिकेड्स लावून मोर्चा थांबवण्यात आला. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. खासदारांना पुढे जाऊ दिले नाही तेव्हा ते रस्त्यावर बसले.
इतर महत्वाच्या बातम्या