Sanjay Raut on Devendra Fadnavis and Election Commission: निवडणूक आयोगाकडून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, त्यांच्याकडून लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. मतदार यादी घोळ समोर येत आहे, हा आयोग सरकारचा हस्तक म्हणून काम करत असल्याचा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आज (11 ऑगस्ट) निवडणूक आयोगाच्या दारात इंडिया आघाडीचा मोर्चा जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर विरोधकांकडून आरोप झाल्यानंतर सातत्याने निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही कडाडून प्रहार केला. देवेंद्र फडणवीस यांना उपचाराची गरज असून 50 ते 60 जागांवर शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाने घोळ करून मोदी पंतप्रधान झाले आहेत. शेवटच्या तासांमध्ये आयोगाच्या मदतीने मते चोरून मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे चोरांची बाजू फडणवीस घेणारच, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
तुरुंगात टाकणार असतील तर आमची तयारी
संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी निवडणूक आयोगाची प्रकरणी दररोज बाहेर काढत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जागृतीसाठी आज दिल्लीमध्ये आंदोलन होत आहे. मात्र, या आंदोलनाला परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे त्या ठिकाणी भाजप आंदोलन करतच आहे मग आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन करत असू तर का रोखता? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की आम्ही आंदोलन केल्यानंतर जर ते तुरुंगात टाकणार असतील तर आमची तयारी आहे.
निवडणूक आयोग हा दुतोंडी गांडूळ
दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे पुरावे मागितल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आयोगावर तुटून पडले. ते म्हणाले की, राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. मात्र, निवडणूक आयोगाला महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा पुरावे दिले होते. निवडणूक आयोग हा दुतोंडी गांडूळ आहे. आमचा स्वतःचा त्यांच्यावर विश्वास नसल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की आमच्या अमोल कीर्तेकरांची जागा यांनी कशा पद्धतीने चोरली हे समोरच आहे. इतकेच नव्हे तर शिवसेना चिन्ह आणि पक्ष चोरून चोरांच्या हाती दिल्याचा हल्लाबोलही राऊत यांनी केला. त्यामुळे आयोगाने पुराव्याचं काही सांगू नये, राहुल गांधी यांनी जे पुरावे दिले आहेत ते वेबसाईटवर आहेत.
फडणवीस आयोगाच्या दरोड्याचे लाभार्थी
त्यांनी पुढे सांगितले की हा निवडणूक आयोग भाजपचा हस्तक झाला असून आणि सरकारचा प्रवक्त असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारलं असेल, तर सांगावं असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की फडणवीस आयोगाच्या दरोड्याचे लाभार्थी आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दोड्यातील लाभार्थ्यांनी गप्प राहिले पाहिजे, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
गडकरींच्या मतदारसंघांमध्ये साडेतीन लाख मतांची चोरी
ते म्हणाले की, नितीन गडकरींच्या मतदारसंघांमध्ये साडेतीन लाख मतांची चोरी झाली आहे. गडकरी यांना सुद्धा कोणाला तरी पाडायचं होतं. गडकरींच्या मतदारसंघांमध्ये इतक्यात मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असल्यास विरोधी पक्षांचं काय? असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या