INDIA Alliance March on Election Commission: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज (11 ऑगस्ट) साडे अकरा वाजता इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार करणार आहे. संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मेगा मार्च काढण्यात येणार असून 300 खासदार सहभागी होतील. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिलेली नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे देखील या मोर्चात सहभागी होतील. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, विरोधकांनी मोर्चासाठी परवानगी घेतलेली नाही. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल म्हणाले होते की हे दोघेही मिळून लोकशाहीची हत्या करत आहेत. त्यांनी बिहारमधील SIR वर हल्लाबोल केला आहे.
निवडणूक आयोगाकडून सेम टायमिंग
इंडिया आघाडीकडून मोर्चाची तयारी सुरु असतानाच निवडणूक आयोगाच्या टायमिंगची सुद्धा चर्चा सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी 12 वाजता काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. निवडणूक आयोगाने एक पत्र जारी करून चर्चेचे आवाहन केले आहे. फक्त 30 नेत्यांना त्यात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज विरोधकांकडून संसद परिसरापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत एसआयआर मुद्द्यावर मोर्चा काढला जाईल.
निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात काय लिहिले आहे?
निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, तुमच्या 10 ऑगस्टच्या पत्राचा संदर्भ घेण्याचे आणि आयोगाने त्यात केलेल्या विनंतीचा विचार केला आहे आणि दुपारी 12 वाजता चर्चेसाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे हे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पत्रात पुढे असे म्हटले आहे की, जागेअभावी, कृपया जास्तीत जास्त 30 व्यक्तींची नावे आणि वाहन क्रमांक election@eci.gov.in वर ई-मेल करून कळवा.
निवडणूक आयोगाची चोरी पकडली गेली
दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावर काँग्रेस खासदार सुखदेव भगत म्हणाले की, निवडणूक आयोगाची चोरी पकडली गेली आहे, त्यामुळे आम्हाला घाबरून बोलावण्यात आले आहे. आम्ही आयोगाला जागे करणार आहोत. त्यांनी असेही म्हटले की निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या देखरेखीखाली काम करत आहे.
विरोधी खासदारांसाठी 'डिनर मीटिंग'
दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार, विरोधी खासदारांसाठी दुसरी डिनर मीटिंग आयोजित करण्यात आली आहे, जी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये होणार आहे. इंडिया आघाडीचे सर्व खासदार त्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जमले होते.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर काय आरोप केले?
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला होता. त्यांनी मतदार यादीतील अनियमिततेबद्दलही बोलले. त्याला उत्तर म्हणून निवडणूक आयोगाने राहुल यांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. आयोगाने म्हटले होते की जर आरोप चुकीचे सिद्ध झाले तर त्यांना माफी मागावी लागेल. निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाईचीही चर्चा केली होती.
मुंबईतही विरोधक निषेध करतील
इंडिया आघाडी महाराष्ट्रात मत चोरीचा मुद्दाही उपस्थित करेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल.
राहुल गांधींची डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी
राहुल यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध वेगळी आघाडी उघडली आहे. राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मतांची चोरी ही 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आमची मागणी पारदर्शकता दाखवण्याची आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करण्याची आहे, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः त्याचे ऑडिट करू शकतील.
इतर महत्वाच्या बातम्या