JDU MP On I.N.D.I.A Meeting: नवी दिल्ली : भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट बांधली आहे. विरोधकांच्या याच इंडिया आघाडीची (I.N.D.I.A Alliance) चौथी बैठक मंगळवारी (19 डिसेंबर) दिल्लीत (Delhi) पार पडली. या बैठकीला इंडिया आघाडीत (I.N.D.I.A Alliance Meeting) सहभागी असलेल्या जवळपास सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), नितीश कुमार (Nitish Kumar) आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेस (Congress) नेते ही बैठक यशस्वी असल्याचं म्हणत आहेत, पण नितीशकुमार यांच्या जेडीयूनं (JDU) मात्र वेगळाच सूर लावला आहे. 




इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत माध्यमांशी जेडीयूचे खासदार सुनील कुमार पिंटू (Sunil Kumar Pintu) यांनी तिखट टिप्पणी केली आहे. या बैठकीत फक्त चहा आणि बिस्किटं देण्यात आली. यापूर्वीच्या बैठकांमध्ये समोसेही असायचे, पण या बैठकीत समोसे देण्यासाठी काँग्रेसकडे पुरेसा निधीही नव्हता, त्यामुळे केवळ चहा-बिस्किटांवर बैठक आटोपली गेली, असं त्यांनी म्हटलं आहे.  


"महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालीच नाही"


इंडिया आघाडीच्या बैठकीवर संतापलेले, जेडीयू खासदार सुनील कुमार पिंटू यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना असा दावा केला की, या बैठकीत काहीही अर्थपूर्ण चर्चा झालेली नाही. ते म्हणाले की, मंगळवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत अनेक पक्षांचे बडे नेते महायुतीत सहभागी होण्यासाठी आले होते, मात्र त्यावर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. विरोधी पक्षांची कालची बैठक केवळ चहा-बिस्किटांपुरतीच मर्यादित असल्याचा दावाही यावेळी खासदार सुनीलकुमार पिंटू यांनी केला होता. 


काँग्रेस निधी मागतंय 


जेडीयूचे खासदार सुनील कुमार पिंटू यांनीही काँग्रेस पक्षातर्फे राबविण्यात येत असलेल्या निधी गोळा करण्याच्या अभियानाचाही समाचार घेतला. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, काँग्रेसनं अलीकडेच सांगितलं होतं की, त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे आणि ते 138 रुपये, 1380 रुपये किंवा 13,800 रुपये देणगी मागत आहेत. देणग्या येणं बाकी आहे. त्यामुळे कालची बैठक समोशाशिवाय चहा-बिस्किटांवरच संपली. बैठकीत कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा झाली नाही.


इंडिया आघाडीच्या बैठकीत नितीश लालू नाराज? 


I.N.D.I.A आघाडीच्या चौथ्या बैठकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि RJD अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या नाराजीचेही दावे केले जात आहेत. भेटीपूर्वी दोघेही खूप खुश दिसत होते. नितीश यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी करणारे अनेक पोस्टर्स बिहारमध्येही लावण्यात आले होते. मात्र, बैठक संपल्यानंतर अद्यापपर्यंत दोन्ही नेत्यांकडून कोणतंही मोठं वक्तव्य समोर आलेलं नाही. बैठकीला उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितलं की, ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली, तेव्हा नितीश कुमार अस्वस्थ दिसू लागले.