नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने काऊन्सेल अॅक्सेस दिल्यानंतर आज भारतीय अधिकारी त्यांची भेट घेणार आहे. पाकिस्तानमधील भारताचे उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया हे भारतीय अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेणार आहेत.


आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना काऊन्सेल अॅक्सेस देण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतर पाकिस्तानकडून काल त्यासाठीचा प्रस्ताव देण्यात आला. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली होती. कुलभूषण जाधव यांना 2 सप्टेंबर ला काऊन्सेल अॅक्सेस उपलब्ध करुन देण्यात येईल, व्हिएन्ना करार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश आणि पाकिस्तानी कायद्यानुसार ही मदत देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. भारताने हा प्रस्ताव स्विकारला असून भारतीय अधिकारी गौरव अहलूवालिया जाधव यांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत.


तथाकथित हेरगिरीच्या आरोपांवरुन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना जुलै 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली. तसेच त्यांना भारतीय दुतावासाची मदत देण्यात यावी, असा आदेश दिला आहे.