Independence Day: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सोशल मीडियावरील डीपी बदलून राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. देशाप्रतिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी जनतेला हे आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी (13 ऑगस्ट) ट्वीट करुन देशासोबतचं नातं अधिक दृढ करण्यासाठी जनतेला हे पाऊल उचलण्यास सांगितलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "हर घर तिरंगा मोहिमेच्या भावनेनुसार, आपण आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा डीपी बदलूया आणि देशासोबतचं आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठी योगदान देऊया." स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2023) पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियावरील अकाऊंटचा डीपी बदलला असून आता त्यांच्या डीपीवर तिरंगा ध्वजाचा फोटो आहे.


स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला 1,700 विशेष पाहुणे राहणार उपस्थित


यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 1,700 विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. एका अधिकृत प्रकाशनात म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित केलेल्या 1,700 विशेष पाहुण्यांमध्ये जल जीवन मिशन, पीएम किसान सन्मान निधी योजना, अमृत सरोवर योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प यासारख्या विविध प्रमुख कार्यक्रमांशी संबंधित लोकांचा समावेश आहे."


पंतप्रधान मोदींचे फोटो आणि घोषणांनी छापलेल्या पतंगांनी गुंजणार आकाश


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातून आकाशात विशेष पतंग सोडण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदींचे फोटो असलेल्या पतंगांनी आकाश गजबजून जाणार आहे. काही पतंगांवर विशेष घोषवाक्यं देखील लिहिण्यात आलेली आहेत. डबल इंजिन की सरकार, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आणि आझादी का अमृत महोत्सव अशा छापील घोषणांच्या पतंगांनी आकाश गजबजून जाणार आहे.


'डबल इंजिन सरकार' घोषवाक्य लिहिलेल्या पंतंगांना विशेष मागणी


जुन्या दिल्लीतील लाल कुआं आणि उत्तर-पूर्व दिल्लीतील जाफराबाद भागातील पतंग बाजारात आतापासूनच राजकीय व्यक्तींचे पतंग विक्रीसाठी पाहायला मिळत आहेत. डबल इंजिन सरकार असं छापलेल्या पतंगांना बाजारात मोठी मागणी असल्याचं दिसत आहे, अनेक दुकानांमध्ये हा पतंग संपला असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे.या पतंगावर पंतप्रधान मोदींच्या फोटोसह 'डबल इंजिनचं सरकार-स्वप्नातील सरकार' असं लिहिलेलं असून कमळाच्या फुलाचं चित्रही छापण्यात आलं आहे. एका पतंगावर पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत इंडिया गेट, लाल किल्ला आणि कमळाच्या फुलाचं चित्र आहे, ज्यावर 'जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष' असं लिहिलं आहे.


हेही वाचा:


Independence Day 2023 : 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी बारामतीच्या शेतकरी दाम्पत्याला निमंत्रण, राज्यातील 24 शेतकरी उत्पादक संघटना योजनेचे लाभार्थीही उपस्थित राहणार