Independence Day 2023 : यावर्षी आपण 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. या निमित्ताने 'मेरी माती मेरा देश' (Meri Maati Mera Desh) या मोहिमेअंतर्गत जम्मू पोलिसांनी श्रीनगरमध्ये 'हर घर तिरंगा रॅली' (Har Ghar Tiranga) काढली. या रॅलीत अनेक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. एएनआयने या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या रॅलीच्या व्हिडीओमध्ये अनेक विद्यार्थी फलक आणि झेंडे घेऊन मोर्चा काढताना दिसतायत.
'मेरी माती मेरा देश मोहिम' ही जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक भाग आहे. पूर्व श्रीनगरचे डीएसपी शिवम सिद्धार्थ यांच्या म्हणण्यानुसार, ते मोहिमेद्वारे देशातील गायक नायकांबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवत आहेत.
'मेरी माती मेरा देश' या मालिकेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'हर घर तिरंगा अभियान'चे महत्त्वही लष्कराने सांगितले. या मोहिमेमध्ये शनिवारी (12 ऑगस्ट रोजी) मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील 26 पंचायती पासून सुरु झाली. गांदरबल येथील जिल्हा युवक सेवा आणि क्रीडा कार्यालयाने झोन कांगणमध्ये सकाळची मिरवणूक तसेच मेरी माती मेरा देश या व्यापक थीम अंतर्गत आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
'हर घर तिरंगा' अभियान नेमकं काय?
'हर घर तिरंगा' हे अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची मोहीम आहे. या अभियानाचा उद्देश भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकांनी घरोघरी तिरांगा आणून तो फडकवावा यासाठी लोकांना प्रेरित करणे असा आहे. स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्षी राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचे प्रतीक नाही तर राष्ट्र उभारणीसाठी असलेल्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात येतं.