नवी दिल्ली : प्रत्येक देशाच्या विकासाची एक वेळ असते, भारत नव्या संकल्पातून पुढे जात असताना आता विकासाची आता वेळ आली असून ती संधी आपल्याला साधायला हवी. त्यासाठी भारतीय सामर्थ्याचा पूर्ण वापर करणे ही काळाची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या सोहळ्यानिमित्त ते लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करत होते. 


देश नव्या संकल्पातून पुढे जात असून नवीन संकल्पांना आधार बनवून विकास साध्ये करायला हवा. आज भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून येत्या 25 वर्षात भारतीय स्वातंत्र्य 100 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. या अमृतकाळाच्या सोहळ्यावेळी आपण आज केलेल्या संकल्पांची सिध्दी करणं आवश्यक आहे. ती आपल्यासाठी गौरवपूर्ण गोष्ट असेल. 


स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवाच्या वेळी भारतातील सुविधांचा आणि विकासाचा स्तर हा गाव आणि शहरात भेदभाव करणारा नसेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. नागरिकांच्या जीवनात सरकार विनाकारण दखल नाही आणि देश अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी समृद्ध असेल. त्यासाठी आपण आपल्या संकल्पनेला परिश्रमाची आणि पराकाष्टाची जोड देणं आवश्यक आहे. 


सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या चतु:सूत्री च्या माध्यमातून शतप्रतिशत विकास साधता येईल. त्यामुळे कोणीही विसासापासून वंचित राहणार नाही. 2024 पर्यंत रेशनच्या माध्यमातून, मध्यान आहार योजनेच्या माध्यमातून सर्व गरिबांना तांदूळ फोर्टिफाईड करुन वितरित करण्यात येणार आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशाच्या फाळणीची वेदना कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसेमुळे आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना विस्थापित व्हावे लागले आणि प्राणही गमवावे लागले. त्या लोकांचा संघर्ष आणि त्याग लक्षात ठेवून. 14 ऑगस्ट हा 'फाळणी वेदना दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  हा दिवस आम्हाला केवळ भेदभाव, वैमनस्य आणि वाईट इच्छा यांचे विष काढून टाकण्यासाठी प्रेरणा देईल, सोबतच एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांनाही बळकट करेल."