Income Tax : आज 1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आयकर (25 वी सुधारणा) नियम 2021 अंतर्गत 1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्यामध्ये क्रिप्टो टॅक्सेशन सुरू होणार आहे. अपडेटेड रिटर्न भरताना काही बदल करण्यात आले आहेत. EPF व्याजावरील नवीन कर नियम आणि कोविड-19 उपचारांवरील कर सवलत देखील समाविष्ट करण्यात आलीय. 


ईपीएफ खाते
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यावर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या करमुक्त योगदान मर्यादेचा समावेश आहे.


ITR मध्ये बदल
आयकर विवरणपत्रात आणखी एक मोठा बदल करण्यात येत आहे. करदात्यांना संबंधित मूल्यांकन वर्ष संपल्यापासून दोन वर्षांच्या आत आयकर रिटर्नमध्ये झालेल्या चुकांसाठी अपडेटेड रिटर्न भरण्याची मुभा असेल.यापूर्वी, कर रिटर्नमध्ये सुधारणा करण्यासाठी, रिटर्न भरण्याच्या नियत तारखेपासून फक्त 5 महिन्यांचा कालावधी असेल. तसेच कोणतीही व्यक्ती अतिरिक्त नुकसान किंवा कर दायित्व कमी झाल्याची तक्रार करण्यासाठी अपडेटेड रिटर्न दाखल करू शकणार नाही.


म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड किंवा देशांतर्गत कंपन्यांकडून मिळालेला लाभ यापुढे कराच्या कक्षेत ठेवला जाईल. उच्च कराच्या गुंतवणूकदारांवर अधिक कर आकारला जाईल, तर कमी कर गुंतवणूकदारांवर कमी ओझे असेल.


कोविड उपचार
नव्या नियमांनुसार राज्य सरकारी कर्मचारी, कोविड प्रभावित कुटुंबे आणि अपंग व्यक्तींसाठीच्या तरतुदींचाही समावेश आहे.कोविड बाधित कुटुंबांनाही कर सवलतीच्या विशेष तरतुदी उपलब्ध असतील.मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांपर्यंत मिळालेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही, जर त्यांना ही रक्कम मृत्यूनंतर 12 महिन्यांच्या आत मिळाली असेल. अशा व्यक्तींच्या पालकांनी त्यांच्यासाठी विमा योजना विकत घेतल्यास, ते विशिष्ट परिस्थितीत कर सवलतीचा दावा देखील करू शकतात.


सरकारी सेवा कर्मचारी
राज्य सरकारी कर्मचारी कलम 80CCD(2) अंतर्गत नियोक्त्याद्वारे त्यांच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या 14 टक्क्यांपर्यंत NPS योगदानासाठी कपातीचा दावा करू शकतात.


क्रिप्टो कर
केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रिप्टो करन्सीसारख्या डिजिटल मालमत्तेतून नफ्यावर 30 टक्के कर आकारला जाईल अशी घोषणा केली होती.तसेच गुंतवणूकदारांकडून अशा प्रकारे शुल्क आकारले जाईल, डिजिटल मालमत्ता प्राप्तकर्त्यांवर देखील कर आकारला जाईल. भेटवस्तू म्हणून डिजिटल मालमत्ता प्राप्त करणाऱ्या प्राप्तकर्त्यांना काही अटींच्या अधीन राहून 1% TDS आणि भेट कर भरावा लागेल.


आयकर रिटर्न भरू शकता पण...


आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली होती. आयकर रिटर्न भरण्याची ही शेवटची तारीख होती. या तारखेपपर्यंत आयकर रिटर्न न भरणाऱ्यांना 31 मार्च 2022 पर्यंत आयकर रिटर्न भरण्याची संधी होती. परंतु,  यासाठी थोड्या प्रमाणात दंड भरावा लागत होता. आता दंड अजून वाढणार आहे.


किती दंड भरावा लागणार?
आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती. यानंतर जर तुम्ही मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी रिटर्न भरल्यास पाच हजार रुपये दंड भरावा लागणार. पाच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर एक हजार रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही 31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरले तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. 31 मार्च 2022 पर्यंत आयकर रिटर्न न भरल्यास आयकर विभाग तुम्ही जमा न केलेल्या कराच्या 50 टक्के इतका दंड देखील आकारू शकतो.  मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची पहिली शेवटची तारीख 31 जुलै 2021 होती. नंतर ती 20 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर 31 डिसेंबर 2021 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती.  


संबंधित बातम्या


PAN Aadhaar Link : 'या' व्यक्तींना पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक नाही, जाणून घ्या काय आहे कारण?


रिटर्नची ड्यू डेट चुकवली, तर आयकर रिफंड मिळणारच नाही, जाणून घ्या कारण