नवी दिल्ली: दिल्लीच्या जेएनयूमध्ये विद्यार्थी बेपत्ता झाल्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. काल दुपारी चार वाजल्यापासून म्हणजे तब्बल 16 तासांपासून संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंचं कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीला घेराव घातला आहे.

एमएससी बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी असलेला नजीब हा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. जेएनयू प्रशासन नजीबचा शोध घेण्यात चालढकल करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एबीव्हीपीनं नजीबवर मारहाणीचा आरोप केला होता. त्यांनंतर 15 ऑक्टोबरपासून नजीब बेपत्ता आहे. त्यामुळे जेएनयू एसयू संघटनेनं एबीव्हीपीवर टीका केली आहे.

दिल्ली पोलिसांनी नजीबचे पोस्टर्स शहरभर लावले आहेत. नजीबला शोधणाऱ्याला 50 हजाराचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी बोलून याबाबत माहिती घेतली आहे.